पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. मागील दोन वर्षांपासून या मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू होतं. उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोतून फेरफटका मारला. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हेदेखील उपस्थित होते. आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगर असं अंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करत पार केलं. जानेवारी २०२२ मध्ये या मेट्रोचा पुढचा टप्पा कार्यन्वयित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभर या मेट्रो उद्घाटनाची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली दिसली. मात्र याच मेट्रोच्या उद्घाटनावरुन भाजपाच्या एका आमदाराने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार असणाऱ्या मनोज कोटक यांनी कनापूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर ‘बालहट्टा’पायी मुंबई मेट्रोचं काम अडकल्याचा टोला लगवलाय. “कानपूर मेट्रोचं बांधकाम २०१९ मध्ये सुरु झालं होतं आजपासून सेवा सुरु झाली. मुंबईमधील मेट्रो तीनच्या मार्गीचं काम मागील अनेक वर्षांपासून सुरु असून बालहट्ट आणि अहंकारामुळे या कामात अडथळे येतायत,” असा टोला कोटक यांनी लगावलाय.

इतकचं नाही तर पुढे कोटक यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. “महाविकास आघाडीमध्ये नेतृत्वाची कमतरता आहे. मात्र यामध्ये भाजपाने कायमच आपली ताकद दाखवलीय. मग ते उत्तर प्रदेशमधील योगीजी असो किंवा महाराष्ट्रामधील देवेंद्र फडणवीसजी असो,” असं कोटक म्हणालेत.

२०१९ साली आरे येथे मेट्रोची कारशेड उभारण्याच्या मुद्द्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी आरेतील झाडं रात्रीच्या अंधारात कापण्यात आलेली. यावरुन तेव्हा सत्तेत असणाऱ्या भाजपा शिवसेना युतीमधील मतभेद समोर आले होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी कारशेडला विरोध केला होता. भाजपासोबत मुख्यमंत्री पदावरुन बिनसल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात सत्तेत आल्यानंतर आरे कारशेडच्या जागेवरील झाडं वाचवण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे महाविकास आघाडी सरकारने मागे घेतले होते.