विधानसभा निवडणुकीत जास्त जागा देण्याच्या भाजपच्या भूमिकेमुळे रूंदावलेली शिवसेना-भाजपमधील दरी आता अधिक खोल होऊ लागली आहे. ४ सप्टेंबर रोजी मुंबईत येत असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेण्याचे नाकारले आहे. ही गोष्ट शिवसेनेला चांगलीच झोंबली असून ‘शहा यांना भेटीचे निमंत्रण स्वत:हून देणार नाही’ अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर ‘योग्य वेळी’ भेट होईल, असे सांगत भाजपनेही सेनेच्या नाराजीला महत्त्व देण्याचे टाळले आहे.
 अमित शहा ४ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येत असून भाजप नेत्यांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्येही गणेशदर्शनासाठी जाणार आहेत. मात्र आतापर्यंतच्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी पाळलेल्या प्रथेनुसार ते ठाकरे यांची भेट घेणार नाहीत. जागावाटपाचे गाडे अडलेले असताना तो तिढा सोडविण्यासाठी या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत काही निर्णय होऊ शकतो. मात्र भाजपला अधिक जागा देण्याची भूमिकाच शिवसेनेला मान्य नसल्याने आणि प्रदेश नेत्यांच्या चर्चेत जागावाटपाच्या दृष्टीने एकही पाऊल पुढे न सरकल्याने ठाकरे यांची भेट न घेण्याचे शहा यांनी ठरविले आहे. शिवसेनेला १७१ व भाजपला ११७ या जागावाटपाच्या पूर्वीच्याच सूत्रापासून ढळण्यास जर शिवसेना तयार नसेल, तर भेट घेऊन उपयोग होणार नाही. जागावाटप झाल्यावर थोडा वाद असेल, तरच केंद्रीय नेतृत्व हस्तक्षेप करेल. पण ठाकरे यांना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांशीच चर्चा करावी लागेल, असा शहा यांचा दृष्टिकोन आहे. हे शिवसेनेला फारसे रुचणारे नाही. त्यामुळे आता शहा यांच्याशी भेटीचा प्रस्ताव शिवसेना पाठविणार नसून त्यांना भेटायची इच्छा असल्यास स्वागतच केले जाईल, असे शिवसेनेने ठरविले आहे. शहा मुंबई भेटीत ‘मातोश्री’ निवासस्थानी येतील, अशी अपेक्षा सेना नेते दिवाकर रावते यांनी  व्यक्त केली. तर शिवसेनेशी आमचे संबंध चांगले आहेत, पण शहा-ठाकरे भेट यावेळी ठरलेली नसून ती ‘योग्य वेळी’ होईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.