शिवसेनेच्या तुलनेत सहा टक्के अधिक मते; कमी जागा लढवूनही सेनेपेक्षा अधिक जागा

यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला गतवेळच्या तुलनेत कमी जागा मिळाल्या असल्या तरी, देशाच्या आर्थिक राजधानीत मात्र, भाजपने गतवेळच्या तुलनेत एक जागा जास्त जिंकली आहे. एवढेच नव्हे तर, शिवसेनेच्या तुलनेत दोन जागा कमी लढवूनदेखील सेनेपेक्षा भाजपचे जास्त आमदार निवडून आले आहेत. मतांच्या टक्केवारीतही भाजप आघाडीवर असून ३० टक्के अर्थात १३ लाखांहून अधिक मते भाजपच्या पारडय़ात पडली आहेत. त्याखालोखाल शिवसेना (२४ टक्के), काँग्रेस (२० टक्के), मनसे (९ टक्के), राष्ट्रवादी (४ टक्के) अशी मतविभागणी आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये देशाची आर्थिक राजधानीत असलेल्या मुंबईवर कोण वर्चस्व मिळविणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. शिवसेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि वंचित किती जागा मिळविणार यावरून गेले काही दिवस मुंबईकरांना चर्चेचा फड रंगला होता. शुक्रवारी मतमोजणी पार पडली आणि मुंबईमधील ३६ मतदारसंघांपैकी १६ ठिकाणी भाजपचा, १४ ठिकाणी शिवसेनेचा, चार ठिकाणी काँग्रेसचा, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा प्रत्येकी एका ठिकाणी विजय झाला.

शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर मुंबईमधील १९ जागा शिवसेनेच्या, तर १७ जागा भाजपच्या वाटय़ाला आल्या. भाजपने मित्रपक्ष शिवस्वराज्यसाठी वर्सोव्यातील एक जागा सोडली. मात्र शिवस्वराज्यने भाजपच्या निशाणीवरच ही जागा लढविली. शिवसेनेचा भगवा १४ मतदारसंघांत फडकला, तर भाजपचे कमळ १६ मतदारसंघांमध्ये फुलले. अशा एकूण ३० मतदारसंघांमध्ये युतीचा विजय झाला. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढलेल्या भाजपने १५ तर शिवसेनेने १४ जागा जिंकल्या होत्या.  काँग्रेसने २९, तर राष्ट्रवादीने सहा ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी काँग्रेसचा चार, तर राष्ट्रवादीचा एका मतदारसंघात विजय झाला. समाजवादी पार्टीलाही एका मतदारसंघात विजय मिळाला. मात्र सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविणाऱ्या मनसेचा मुंबईमधील एकाही उमेदवाराला विजय मिळविता आला नाही.

पक्षनिहाय मिळालेली मते आणि टक्केवारी

  •  मुंबईमधील मतदारांची संख्या सुमारे ९७ लाख ६३ हजार २६२ इतकी आहे. त्यापैकी ५०.४ टक्के इतके मतदान झाले. गुरुवारी झालेल्या मतमोजणीअंती यापैकी १३ लाख १४ हजार ३७४ मतदारांनी भाजपला साथ दिल्याचे उघड झाले आहे. तर शिवसेनेला ११ लाख ८३ हजार ४६९ मतदारांनी मतदान केले.
  •  त्याखालोखाल १० लाख १९ हजार ८३४ मतदारांनी काँग्रेसवर विश्वास टाकून मतांचा जोगवा दिला. अवघ्या सहा ठिकाणी निवडणूक लढविणाऱ्या राष्ट्रवादीवर दोन लाख एक हजार ५८ मतदारांनी विश्वास दाखविला आहे.
  • सत्ताधाऱ्यांवर तोफ डागणाऱ्या मनसेवर सुमारे साडेचार लाख मुंबईकर मतदारांनी विश्वास दाखविला आहे.  मुंबईतील ३६ पैकी २५ मतदारसंघांत निवडणूक लढविणाऱ्या मनसेला एकूण चार लाख ६२ हजार ५९४ मते मिळाली. तर ‘वंचित’च्या खात्यात जेमतेम दीड लाख मते पडली आहेत.