तरच उमेदवार रिंगणात; विधान परिषद पोटनिवडणूक
विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीकरिता भाजपचा उमेदवार कोण असेल याकडे काँग्रेसचे लक्ष असून ऐन वेळी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची उमेदवारी पुरस्कृत केल्यास तेवढय़ाच ताकदीचा उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ही पोटनिवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. भाजपने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविल्यास ते महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राणे यांच्या उमेदवारीला शिवसेनेने आधीच विरोध केला आहे. त्यातच राणे उमेदवार असल्यास शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी हे तीन पक्ष एकत्र येणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठीही सोयीचे नाही.
राणे यांच्या उमेदवारीची शक्यता गृहीत धरून काँग्रेसने आर्थिकदृष्टय़ा तगडा उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली आहे. भाजपने राणे यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणता उमेदवार उभा केल्यास ही पोटनिवडणूक काँग्रेस वा शिवसेनेकडून तेवढी प्रतिष्ठेची केली जाणार नाही, असे संकेत दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देण्यात आले.
भाजपमध्ये अनेकांनी या जागेसाठी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. माधव भांडारी, शायना एन. सी., प्रसाद लाड, प्रमोद जठार यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करूनच उमेदवाराचे नाव निश्चित करणार आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.
विधानपरिषदेसाठी काँग्रेसला पाठिंबा – अजित पवार</strong>
कराड : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत खिंडीत गाठण्याची तयारी राष्ट्रवादीच्या संगतीने काँग्रेसने आखली असल्याचे आज अधोरेखित झाले. विधानपरिषदेची ही जागा काँग्रेसची असून, तो देतील त्या उमेदवारास पाठिंबा राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. समविचारी पक्षांच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला होऊ नये अशी भूमिका असल्याचे ते म्हणाले. सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकारण कसे करावे याचे धडे चव्हाणसाहेबांनी दिले. मात्र, अशा मार्गावरून जाण्याऐवजी भाजप सरकार भरकटले आहे. यशवंतरावांच्या जिल्ह्याला केवळ आश्वासने दिली गेली. आजच्या राज्यकर्त्यांनी दिलेला एकही शब्द पूर्ण केलेला नाही. शेतकऱ्यांना गोळय़ा घालण्याचेच काम या सरकारने केले असून, तरुणांना नोकऱ्या नाहीत, शिक्षक, कामगारवर्ग वाऱ्यावर असून, नोटाबंदी, जीएसटीमुळे असंतोष धुमसत आहे. सर्वच पातळय़ांवर अपयशी ठरलेल्या भाजप सरकारने आमच्या काळातील योजना बंद केल्या. विजेचाही खेळखंडोबा झाला अशी टीका अजित पवार यांनी केली.