मुंबई : राजकीय भवितव्य पणाला लावून हिंमत दाखविल्याने आणि भाजप सत्तापिपासू नसल्याने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. तेच भाजप-शिवसेना युती सरकारचे नेते आहेत आणि अडीच वर्षांनंतरही आम्ही बहुमत मिळवून पुन्हा सत्तेवर येऊ, असा ठाम विश्वास  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या समारोपाच्या भाषणात फडणवीस यांनी यापूर्वीच्या ठाकरे सरकारवर टीका करतानाच नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. सत्तेवर येताच ओबीसींना राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून दिले. काही जिल्ह्यांमध्ये अडचण असून त्याबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठी लढाई करावी लागेल, ती पूर्ण होईपर्यंत आमच्या युती सरकारच्या काळात मराठा समाजासाठी सुरू केलेल्या आणि महाविकास आघाडी सरकारने बंद केलेल्या योजना पुन्हा सुरू करू, असे फडणवीस यांनी सांगितले.  कार्यकर्त्यांनी आम्हाला नेतृत्व देऊन मोठे केले आणि संघर्षांच्या किंवा अडचणीच्या काळात ते आमच्या बरोबर राहिले.  आमच्यातील स्नेहबंधामुळे राज्यसभा व विधान परिषद निवडणुकीत भाजपची नव्हे तर विरोधकांची मते फुटली आणि हे सरकारही आले. पण ज्यांनी स्वत:च स्वत:ला सेनापती घोषित केले, त्यांचे सरदार एकामागोमाग एक त्यांना सोडून गेले, अशी टीका फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांची मूळ शिवसेना आमच्याबरोबर आहे. आमची २०१९ मध्ये युती होती आणि बहुमताने निवडून आलो. पण उद्धव ठाकरे यांनी बेइमानी केली. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संगनमत झाले होते. मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिला नसताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे भाजपचा मुख्यमंत्री होईल, हे सांगितले असताना ठाकरे यांनी अडवणुकीची भूमिका घेतली आणि आम्ही संपर्क केला असताना प्रतिसाद दिला नाही. शिंदे व त्यांच्या बरोबरच्या नेत्यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये कुचंबणा झाली. त्यामुळे शिंदे हे हिंमत दाखवून आमच्याबरोबर आल्याने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले असे फडणवीस यांनी सांगितले.

  पदांची फार अपेक्षा ठेवू नका

भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते चांगले काम करीत असून मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्यपाल नियुक्त बारा आमदारांमध्ये आपल्याला स्थान मिळेल, असे अनेकांना वाटत आहे. पण शिवसेनेबरोबर सत्तेत असल्याने त्यांनाही काही वाटा द्यावा लागेल आणि पदांना मर्यादा आहेत. त्यामुळे फार काही अपेक्षा न ठेवता त्यागाच्या भूमिकेतून काम करीत राहण्याचा कानमंत्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

उपमुख्यमंत्रीपद हा सन्मानच

 भाजपने सत्तेसाठी नाही, तर सर्वसामान्य जनतेला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी सत्ता परिवर्तन केले. सत्ता हे आमचे ध्येय नसून परिवर्तनाचे साधन आहे. मला सत्तेचा मोह नसल्याने सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला. पण पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांचा निर्णय हा माझ्यासाठी सन्मानच असून त्यांनी घरी पाठविले असते, तरी गेलो असतो, असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील या घडामोडींच्या काळात भाजपचे मुख्यमंत्री होणार, असे वातावरण होते व अचानक शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाल्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि त्यावर वेगळे अर्थ लावले जात आहेत, अशी सारवासारव फडणवीस यांनी केली.

  भाजपच्या कार्यकारिणीत मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

 हिंदुत्ववादी विचार घेऊन भाजपबरोबर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षनेतृत्वाच्या निर्णयाचा आदर करून त्याग करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजप कार्यसमितीमध्ये मंजूर करण्यात आला. राजकीय, कृषीविषयक आणि ओबीसी राजकीय आरक्षण या संदर्भात ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांनी मांडलेले तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे आमदार आशीष शेलार यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा घेऊन युतीतून जन्माला आलेल्या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष कार्यकर्त्यांना त्यागाचा आदर्श घालून देणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आजच्या भाजपच्या प्रदेश भाजप कार्यसमितीत मंजूर करण्यात आल्याची माहिती  शेलार यांनी दिली.