मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाजनादेश यात्रे’च्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्य़ांत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केल्यानंतर २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात भाजपतर्फे राज्यात ‘महासंपर्क अभियान’ हाती घेण्यात येणार आहे. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील एकूण एक कोटी मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेत युतीची चर्चा सुरू असताना समांतर पातळीवर राज्यातील प्रत्येक मतदारसंघात पक्ष यंत्रणेला कार्यरत करण्याची रणनीती दोन्ही पक्षांनी आखली आहे. त्यानुसारच भाजपने महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडवला आणि राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, तर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आयोजित करत शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न करत लोकांपुढे केवळ भाजपच नाही तर आपणही राहू याची शिवसेनेने काळजी घेतली. आदेश बांदेकर यांचा ‘माऊली संवाद’ आयोजित करत महिला मतदारांशी संवाद साधला. शिवसेनेनेही सर्व मतदारसंघांतील इच्छुकांची चाचपणी करत खासदार-जिल्हाध्यक्षांना प्रत्येक मतदारसंघात सज्ज राहण्याचा आदेश दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १९ सप्टेंबरला नाशिकमध्ये संपत असून समारोपाच्या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यातून शक्तिप्रदर्शनाची तयारी भाजपने केली आहे. आता १९ सप्टेंबरला भाजपच्या बाजूने एक वातावरणनिर्मिती करणारी महाजनादेश यात्रा संपल्यानंतर लगेच आठवडाभरात म्हणजेच २५ सप्टेंबरपासून महासंपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

गांधी जयंतीला नेते मतदारांच्या घरी

महासंपर्क अभियानांतर्गत पक्षाचे बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांपासून तालुका-जिल्हा-राज्यस्तरीय पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधणार आहेत. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी भाजपचे सर्व मंत्री, मोठे नेते घरोघरी जाऊन मतदारांशी वैयक्तिक संपर्क साधतील, असे नियोजन आहे.