पालिकेविरोधात भाजपची सदोष वृक्षवधाची याचिका

मुंबई : अरबी समुद्रातून घोंघावत जाणाऱ्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात मुंबईमधील ८१२ वृक्ष उन्मळून पडले असून वृक्ष पडल्याच्या वा फांद्या तुटल्याच्या सुमारे २,३६४ तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या. मात्र कंत्राटदारांनी वेळीच वृक्ष छाटणी केली असती तर वृक्षहानी टळली असती. ही बाब लक्षात घेत भाजपने आता पालिकेविरोधात वृक्षवधाची याचिका न्यायालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईमधील रस्त्यांवरील झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. त्याचबरोबर मृत आणि धोकादायक वृक्ष हटविण्यात येतात. काही वर्षांपासून या कामासाठी पालिका कंत्राटदारांची नियुक्ती करीत आहे. या कामासाठी नियुक्त कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आली असून नव्या कंत्राटदारांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मार्चमध्ये वृक्ष प्राधिकरण समितीला सादर करण्यात आला होता. मात्र या प्रस्तावाला मंजुरी देण्यास सत्ताधाऱ्यांना मुहूर्तच सापडला नाही. अद्याप या कंत्राटदारांची नियुक्तीच झालेली नाही. परिणामी, मुंबईतील वृक्ष छाटणीचे काम रखडले आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तडाख्यात मुंबईतील उन्मळून पडलेली ८१२ वृक्षांच्या फांद्या हटविण्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असून त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना त्रास होत आहे. या प्रकारानंतर कंत्राटदारांची नियुक्ती झालेली नसल्याचे उघडकीस आले आहे. वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नसल्याचा हरकतीचा मुद्दा सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत उपस्थित केला होता. वृक्ष प्राधिकरण समितीच्या १८ मार्च २०२१ रोजी पार पडलेल्या बैठकीत कंत्राटदार नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तो अद्याप मंजूर झालेला नाही. या विलंबाला कोण जबाबदार आहे, असा सवाल भाजपने या वेळी केला. येत्या आठवडय़ात वृक्ष प्राधिकरण समितीत वृक्ष छाटणीबाबतच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन कामाला सुरुवात करण्यात आली नाही, तर मुंबई महापालिकेविरोधात सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला. उद्यान विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ, मोठी झाडे कापण्यासाठी साधनसामग्री, विद्युत करवती उपलब्ध नाहीत. रस्त्यावरील पालापाचोळा उचलण्यासाठी यंत्रणा तोकडी पडत आहे. वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता तर मार्च-एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे भार हलका झाल्याने किती तरी झाडे कोसळलीच नसती, असे स्पष्ट करीत भाजप सदस्यांनी वृक्ष प्राधिकरण समिती आणि पालिका प्रशासनाचा निषेध केला.