मुंबईची लोकल हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा आणि जवळपास जीवनावश्यक गोष्टींचा एक भाग झाला आहे. त्यामुळेच लोकल ट्रेनला मुंबईची लाईफलाईन असं म्हटलं जातं. याच लोकल ट्रेनसाठी आता आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २.५ कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे. मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये विमानातील ब्लॅक बॉक्सप्रमाणेच ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवण्यात येणार आहे. मोटरमनच्या केबिनमध्ये ही प्रणाली बसवली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी बाब ठरली आहे.

२०२२-२३च्या केंद्रीय अर्थसंकल्पात लोकल ट्रेनमधील या प्रणालीसाठी रेल्वे मंत्रालयाने आर्थिक निधीची तरतूद केली आहे. यातून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये ही प्रणाली बसवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबच लोकल ट्रेनच्या बाहेरच्या बाजूला देखील सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार!

मुंबई विभागात पश्चिम रेल्वेने आत्तापर्यंत २५ रेल्वेमध्ये ही प्रणाली बसवली आहे. “इतर सर्व रेल्वेमध्ये येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत ही प्रणाली बसवण्याचं काम पूर्ण होईल”, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेच्या बाहेरच्या बाजूला सीसीटीव्ही

दरम्यान, रेल्वेच्या बाहेरच्या बाजूला सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकलच्या फूटबोर्डवर उभ्या असणाऱ्या प्रवाशांकडील ऐवज हिसकावून घेण्याच्या घटना घडत असून अशा घटनांचा तपास करण्यासाठी या सीसीटीव्हींची मदत होईल, असं सांगण्यात आलं आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे लोकल सुरू असतानाचे धक्के आणि कंपनांमध्ये देखील योग्यरीत्या व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकणारे असतील.