किड्या मुंग्यांसारखं मरणार की हक्कासाठी धडक देणार…? असा सवाल विचारणारे मनसेचे फलक काही दिवसांपासून मुंबईत दिसत होते… व्हॉट्स अॅपवर मेसेजेस फॉरवर्ड झाले… सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली… त्यात स्वत: मोर्चाचं नेतृत्त्व करणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती… त्यामुळेच या मोर्चाबद्दल उत्सुकता होती… अनेक महिन्यांनंतर राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरणार होते… रेल्वे प्रशासनाला जाब विचारणार होते… म्हणूनच मनसेचा मोर्चा पाहायला मरिन लाईन्समधला मेट्रो सिनेमा गाठला… इथूनच राज ठाकरेंचा ‘संताप मोर्चा’ सुरु होणार होता…
मोर्चाची वेळ ११.३० ची होती… त्यामुळे ११ च्या आधीपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमायला सुरुवात झाली.. कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं… बऱ्याच महिन्यांपासून पक्षाला काही कार्यक्रम नव्हता… आंदोलनंही नव्हती… त्यामुळेच या आंदोलनाबद्दल विशेष उत्सुकता होता…. कित्येक महिन्यांनंतर मनसे हा वेगवेगळी आंदोलनं करणारा पक्ष रस्त्यावर दिसणार होता… राज ठाकरेंच्या एका इशाऱ्यावर हजारो कार्यकर्ते मेट्रो सिनेमाजवळ जमले होते… कशाला हवी बुलेट ट्रेन, नियमित करा लोकल ट्रेन… अशी घोषणाबाजी सुरु होती.. मात्र राज ठाकरेंची ट्रेन जवळपास दीड तास ‘लेट’ झाली… तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही… मुंबईकर जसे दररोज लोकलची वाट पाहतात, तसेच मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या आगमनाची वाट पाहात होते…
मुंबई मराठी माणसाची, नाही तुमच्या बापाची… प्रधानसेवक देशाचा असा कसा, नुसता गुजरातचा होतो कसा… वाचवा रे वाचवा, मुंबई वाचवा, असे फलक मोर्चेकरांनी आणले होते… कित्येक महिन्यांनंतर नेतृत्त्वानं रस्त्यावर येण्याचं आवाहन केल्यानं कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह होता… रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये बुलेट ट्रेनच्या वेगासारखा उत्साह ‘सुस्साट’ पाहायला मिळाला… मात्र सामान्य नोकरदार मुंबईकर या मोर्चापासून दूरच होता… ‘मनसैनिकांची साथ आणि मुंबईकरांची पाठ,’ असं चित्र मोर्चात दिसलं…
कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांची घोषणाबाजी ११ च्या आधीपासूनच सुरु होती.. हळूहळू गर्दी वाढत होती… कार्यकर्त्यांची संख्या वाढली… साधारणत: १ च्या सुमारास राज ठाकरेंची पत्नी, मुलगा आणि मुलगी मोर्चात सहभागी झाले… थोड्या वेळानं राज ठाकरेंचीही एन्ट्री झाली… कार्यकर्त्यांचा उत्साह दुपटीनं वाढला… राज ठाकरेंची क्रेझ अद्यापही कायम असल्याचा प्रत्यय आला… राज ठाकरेंच्या जवळ जाण्यासाठी एकच चढाओढ सुरु होती… त्यामुळे एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चातच चेंगराचेंगरी होते की काय, अशी भीती वाटली… मेट्रो सिनेमाजवळील गोल मशिदीजवळ प्रचंड गर्दी झाली होती… मात्र परिस्थिती वेळीच आटोक्यात आली…
मोर्चा पुढे चालू लागला… रस्त्याशेजारील इमारतींमधील लोक डोकावून मोर्चा पाहत होते… त्यानंतर मोर्चा डावीकडे वळला… चर्चगेट स्टेशनकडे चालू लागला… आयकर भवन, प्रतिष्ठा भवन या कार्यालयांमधील लोक मोर्चा पाहत होते… लंच टाईम सुरु असल्यानं खाली आलेले काहीजण मोर्चाकडे बघत होते… नोकरदार मुंबईकर मोर्चापासून लांब होता, याचं ते बोलकं चित्र होतं… राज ठाकरेंच्या आसपास जाण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न इथंही सुरुच होता… मात्र त्यांच्या बाजूला सुरक्षा रक्षकांचं कडं होतं…
थोड्या वेळानं मोर्चा चर्चगेट स्टेशनला पोहोचला… खरंतर मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्टेशन हे अंतर फार फार तर १५ मिनिटांचं… मात्र तरीही मोर्चा म्हटलं की अर्धा तास लागेल असं वाटलं… आणि झालंही तसंच… चर्चगट स्टेशनबाहेर राज ठाकरे भाषण करणार होते… रेल्वेतल्या समस्यांवर बोलणार होते… अन् त्याच्याच पुढे दोन मिनिटांच्या अंतरावर दक्षिण मुंबई कामासाठी येणारा नोकरदार मुंबईकर फुटपाथवरील फेरीवाल्यांकडे दुपारचं जेवण जेवत होता…
– कुणाल गवाणकर
kunal.gavankar@loksatta.com