मुंबई : आगामी निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांवर कोणतीही करवाढ लादण्यात आली नसली तरी, घनकचरा व्यवस्थापनाकरिता पालिका मुंबईकरांकडून वापरकर्ता शुल्क वसूल करणार आहे. तसेच उपाहारगृहांनाही ओला कचरा वाहून नेण्यासाठी हे शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे पालिकेला वार्षिक २०० कोटी मिळू शकतील असा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कचऱ्यावर कर न लावल्यामुळे स्वच्छ भारत सर्वेक्षणात मुंबई महापालिकेचा क्रमांक घसरला होता. त्यामुळे कचऱ्यावर कर लावण्याची तयारी पालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी केली होती. मात्र त्यात काही अडचणी उद्भवत होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा अर्थसंकल्पातून या कचरा शुल्काचे सूतोवाच करण्यात आले आहे. वापरकर्ता शुल्क या नावाने हे शुल्क वसूल केले जाणार आहे. वापरकर्ता शुल्क वसूल करण्यासाठीचा मसुदा तयार केला जात असून राज्य सरकारकडून अधिसूचना प्रसारित झाल्यानंतर तो लागू केला जाणार असल्याचे आयुक्तांनी या अर्थसंकल्पात म्हटले आहे. घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ अंतर्गत कचरा शुल्क लावण्याची तरतूद आहे. त्यानुसार पालिकेने हे वापरकर्ता शुल्क लावण्याचे ठरवले आहे. त्यातून पालिकेला १७४ कोटींचे उत्पन्न मिळू शकेल. त्याचबरोबर उपाहारगृहांवरही हे शुल्क लावले जाणार असून त्यातून २६ कोटींचे उत्पन्न मिळू शकणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत साडेतीन हजारांहून अधिक उपाहारगृहे आहेत. जी दररोज जवळपास ३०० टन ओला कचरा निर्माण करतात. त्यातील बहुतांशी कचरा महापालिकेद्वारे वाहून त्यावर प्रक्रिया केली जाते. याकरिता हे शुल्क आकारले जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc budget 20222 bmc charges fees or collection of garbage from mumbaikars zws
First published on: 04-02-2022 at 00:58 IST