मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारे मुंबईत जागोजागी लावण्यात आलेले फलक काढू नयेत, अशा सूचना महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिल्याची बाब शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

बेकायदा फलकबाजीविरोधात दाखल याचिकांवरील सुनावणीच्या वेळी वकील मनोज शिरसाट यांनी एका वृत्तपत्रातील याबाबत प्रसिद्ध झालेले वृत्त न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यातील बरीचसे फलक बेकायदा लावण्यात आले असतील. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त चहल अशा प्रकारचे आदेश कसे काय देऊ शकतात ? असा प्रश्न शिरसाट यांनी उपस्थित केला. त्यावरून सरकार आणि पालिका बेकायदा फलकबाजीच्या समस्येबाबत किती गंभीर आहे हेच दिसून येत असल्याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.

त्यावर मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आपण वृत्तपत्रातील वृत्ताच्या आधारे काहीच आदेश देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. तसेच शिरसाट यांनी त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे मांडावे. त्यानंतर सरकारला त्यावर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितली जाईल, असेही न्यायालयाने म्हटले.