महाराष्ट्रात करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. बहुतांश ठिकाणी लोक सोशल डिन्स्टसिंगच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याबद्दल १४,६०० लोकांकडून २ लाख रुपये दंड वसूल केला. मार्च २०२० पासून, मास्क घालण्याच्या नियमाचा भंग करणाऱ्या १५ लाखाहून अधिक लोकांकडून पालिकेने ३०.५ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिकेचे आयुक्त आय.एस. चहल यांनी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास २०० रुपये दंड आकारला जाईल. त्यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या २५,००० जणांना दररोज पकडण्याचे निर्देशही दिले आहेत आणि आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस मार्शलची संख्याही दुप्पट केली आहे.

मंगळवारपासून महापालिकेने मुंबई पोलिस आणि मध्य व पश्चिम रेल्वे अशा वेगवेगळ्या यंत्रणेव्दारे वसूल केलेल्या दंडाचा एकत्रित डेटा जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. उपनगरीय रेल्वे सेवा देणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेने आतापर्यंत दंड म्हणून ९१,८०० रुपये जमा केले आहेत. बीएमसीच्या आकडेवारीनुसार, नागरी यंत्रणा दररोज सुमारे १३,००० लोकांकडून सरासरी २५ लाखांहून अधिक रक्कम वसूल करीत आहे.
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या करोना संसर्गाची प्रकरणे लक्षात घेता नव्याने निर्बंधांची घोषणा केली होती. पुन्हा लॉकडाऊन लागू करावे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार येत्या आठ दिवसांत परिस्थितीचा आढावा घेईल, असेही ठाकरे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc collects huge fine from people not wearing masks in public places sbi
First published on: 24-02-2021 at 12:16 IST