शहरातील पाऊस थांबला असला तरी रस्त्यांवरील खड्डय़ांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पालिकेच्या संकेतस्थळावर नोंद झालेले खड्डे व बुजवण्यात आलेले खड्डे यामधील दरीही वाढत आहे. रविवार संध्याकाळपर्यंत शहरातील १३६७ खड्डे बुजवणे शिल्लक होते. पालिकेचे अधिकारी मात्र गेल्या वर्षीच्या खड्डय़ांची तुलना करत यावेळचे रस्ते चांगले असल्याची भूमिका घेत आहेत.
 जुलै महिन्याच्या अखेरीस केवळ आठवडाभर पडलेल्या पावसाने मुंबईतील रस्ते पुन्हा खड्डेमय बनले आहेत. रविवारी संध्याकाळपर्यंत पालिकेच्या संकेतस्थळावर तब्बल ७,६७१ खड्डय़ांची नोंद झाली. त्यातील केवळ ६,३०४ खड्डे पालिकेने बुजवले आहेत. १३६७ खड्डे अजूनही बाकी आहेत. विशेष म्हणजे यातील अडीच हजाराहून अधिक खड्डे केवळ गेल्या आठवडयाभरात नोंदवण्यात आले असून शनिवार संध्याकाळच्या तुलनेत रविवारी तब्बल ६३१ खड्डय़ांची भर पडली आहे. मात्र, गेल्यावर्षी नोंदवलेल्या ६० हजाराहून अधिक खड्डय़ांची आठवण करून देत यावेळी परिस्थिती चांगली असल्याचा दावा पालिकेचे अधिकारी करत आहेत.
२३ ऑगस्टपर्यंत मुदत
गणेशोत्सव पूर्वतयारीच्या आयोजनासंबंधी मुंबई उपनगर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नसीम खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वात जास्त तक्रारी खड्डय़ांबाबत केल्या. त्यावर खान यांनी २३ ऑगस्टपूर्वी सर्व रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील ३०० रस्ते दुरुस्त केले असून उर्वरित २५० रस्ते २३ ऑगस्टपूर्वी दुरुस्त केले जातील, अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इतर संस्थांकडील रस्त्यांवर केवळ ७९ खड्डे
एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम खाते, बीपीटी, एमटीएनएल, रिलायन्स अशा संस्थांच्या देखरेखीखालील रस्त्यांवरही खड्डे पडतात, असा दावा पालिकेचे अधिकारी कायम करत असतात. पालिकेच्या संकेतस्थळावर नोंद झालेल्या ७,६७१ खड्डय़ांपैकी केवळ ७९ खड्डे या सर्व संस्थांचे आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc failed to fix potholes
First published on: 18-08-2014 at 02:53 IST