मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने प्रशासनाने मानद डॉक्टरांच्या मानधनात १० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या सेवेत आठवडय़ाला २० तास देणाऱ्या डॉक्टरांना दरमहिना १० हजार रुपये मानधन मिळणार आहे.
पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोठय़ा संख्येने गरीब रुग्ण येतात. त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांसह सर्व संलग्न रुग्णालयांमध्ये १६१ मानद डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. या डॉक्टरांना दर महिन्याला केवळ एक हजार रुपये मानधन दिले जाते. त्यासाठी त्यांना आठवडय़ातील पाच दिवस प्रत्येकी चार तास रुग्णालयात हजर राहावे लागत होते. तुटपुंजे मानधन मिळत असल्याने चांगले डॉक्टर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा देण्यास राजी होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी नगरसेवकांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर पालिका प्रशासनाने मानद डॉक्टरांच्या मानधनात १० पटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पालिका रुग्णालयांमध्ये आठवडय़ातील तीन दिवस सेवा देणाऱ्या मानद डॉक्टरांच्या मानधनातही वाढ करण्यात येणार आहे. त्यांना यापुढे पाच हजार रुपये मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य समिती समोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील मंजुरीसाठी तो स्थायी समितीपुढे सादर करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.