कुलाबा, चर्चगेट, ‘सीएसटी’ परिसरात आजपासून नवे दर
सार्वजनिक वाहनतळ, रस्त्यालगतचे वाहनतळ आणि निवासी वाहनतळांसंदर्भात पालिकेतर्फे आखण्यात आलेल्या नव्या धोरणानुसार दुपटीने शुल्कवाढ करण्यात आली असून आज, सोमवारपासून कुलाबा, चर्चगेट व छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील १८ वाहनतळांवर नवे दर लागू करण्यात येणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे निवडणुकीदरम्यान शिवसेनेने हे धोरण रद्द करण्याचे आश्वासन मुंबईकरांना दिले होते.
मुंबईतील रस्त्यांवर वाहने उभी करण्याला शिस्त लागावी तसेच वाहतूक व पादचाऱ्यांना अडथळा होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने सार्वजनिक वाहनतळ धोरणाची आखणी केली. त्यात सार्वजनिक, रस्त्यालगतचे आणि निवासी असे तीन वाहनतळ गट तयार करण्यात आले. या तीनही गटांतील वाहनतळांवर वेगवेगळे शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या धोरणानुसार वाहनतळांवर दुचाकी वाहन उभे करण्यासाठी ताशी पाच ते १५ रुपये, चारचाकीसाठी २० ते ६० रुपये शुल्क आकारणी सुचविण्यात आली आहे. तासाहून अधिक काळ वाहनतळावर वाहन राहिल्यास पाच रुपयांच्या पटीत शुल्कवाढ सूचित करण्यात आली आहे. निवासी वाहनतळ योजनेनुसार इमारतीबाहेरील रस्त्यावर दिवसा वाहन उभे करण्यासाठी ३९६० रुपये, तर रात्रीच्या वेळेसाठी १९८० रुपये मोजावे लागणार आहेत. पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने मुंबईकरांची लूट करणारे नवे वाहनतळ धोरण रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. या धोरणाबाबत सुवर्णमध्य साधण्याचे आश्वासनही शिवसेनेने दिले होते परंतु या आश्वासनाचा शिवसेनेला विसर पडला आहे. लवकरच इमारतींबाहेरील रस्त्यावरील आणि विकासकांकडून मिळणाऱ्या वाहनतळांवर वाहने उभी करण्यासाठी वसूल केल्या जाणाऱ्या शुल्कातही वाढ करण्यात येणार आहे. तूर्तास तरी कुलाबा ते मरिन ड्राइव्ह व छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा परवानगी प्रशासनाला मिळाली आहे. ९१ वाहनतळांसाठी प्रशासनाने निविदा मागवल्या असून या सर्व ठिकाणी नव्या धोरणानुसार शुल्क आकारणीचा निर्णय घेतला आहे. परंतु नवनिर्वाचित नगरसेवकांना याची माहितीही नाही.
शुल्कवाढ या ठिकाणी..
फोर्ट बायलेन एरिया १ आणि २, वालचंद हिराचंद रोड १ आणि २, शिवसागर राम गुलाम मार्ग, पी. एम. रोड, रामजी कमानी (पश्चिम), रिगल सिनेमा, एम. जी रोड (पश्चिम), बॉम्बे हॉस्पिटल, जे. एन. हरदिया मार्ग, रामजी कमानी (पूर्व), अदी मर्झबान रोड, एमजेपी मार्केट परिसर नं. १, २ आणि ३, एम. जी. रोड , बद्रुद्दीन तय्यबजी मार्ग, नरोत्तम मोरारजी मार्ग, हुतात्मा चौक नं. ३, इरॉस चित्रपटगृहासमोरील वाहतूक बेट, नाथीबाई ठाकरसी मार्ग आणि अन्य रस्ता.
 
  
  
  
  
  
 