‘म्हाडा’ने ७० लाख रुपये दिल्यानंतरही अंधेरीतील आरामनगर येथील निवासी जागेतील व्यवसायांवर कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ
अंधेरीमधील आरामनगर येथील आपल्या वसाहतीमधील निवासी जागांमध्ये थाटण्यात आलेले स्टुडिओ, कार्यालये, व्यायामशाळा, शाळा, शिकवणी वर्ग, दुकाने, केशकर्तनालये आणि डान्स बार याविरुद्ध कारवाई करण्यासाठी ‘म्हाडा’ने पालिकेला तब्बल ७० लाख रुपये दिले आहेत. परंतु पालिकेच्या तिजोरीत सात महिन्यांपूर्वी ही रक्कम जमा करूनही अद्याप या अनधिकृत बांधकामांविरुद्ध कारवाई करण्यास पालिकेला मुहूर्तच सापडलेला नाही. निवासी गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे व्यवसाय करणारे पाणी आणि विजेची चोरी करीत आहेत. परंतु त्याची पालिका आणि बेस्टला तमा नाही. परिणामी, जुहू गल्लीतील औषधाच्या दुकानाला आग लागून झालेल्या दुर्घटनेची या वसाहतीमध्ये पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अंधेरीमधील वर्सोवा परिसरातील आरामनगर येथे ‘म्हाडा’ची मोठी वसाहत आहे. या वसाहतीमधील निवासी गाळ्यांमध्ये ५२ स्टुडिओ, ३७ कार्यालये, आठ व्यायामशाळा, पाच शाळा आणि शिकवणी वर्ग, सहा डान्स बार, १७ दुकाने, चार सलून असे एकूण १३५ अनधिकृत व्यवसाय सुरू आहेत. तेथे मोठय़ा प्रमाणावर पाण्याची आणि विजेची चोरी केली जात आहे. निवासी गाळ्यांमधील अनधिकृत व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय ‘म्हाडा’ने घेतल्यानंतर या व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने निवासी गाळ्यांमधील अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘म्हाडा’ने या अनधिकृत व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्याबाबत पालिकेला पाठविले होते. या कारवाईसाठी ७० लाख रुपये खर्च अपेक्षित असून ही रक्कम ‘म्हाडा’ने द्यावी, असे पालिकेने कळविले होते. त्यानुसार ‘म्हाडा’ने गेल्या डिसेंबरमध्ये ७० लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा केले. ही रक्कम जमा केल्यानंतर सात महिने होत आले तरीही पालिकेने अद्याप आरामनगरमधील १३५ अनधिकृत व्यवसायांवर कारवाई केलेली नाही.
या वसाहतीमधील निवासी गाळ्यांमध्ये मोठमोठय़ा कलावंतांनी स्टुडिओ आणि कार्यालये थाटली आहेत. स्टुडिओमध्ये होणाऱ्या चित्रीकरणाच्या निमित्ताने मोठमोठय़ा ट्रकमधून साहित्याची ने-आण केली जाते. त्यामुळे अवजड वाहनांची येथे सतत वर्दळ असते. येथील डान्स बारमध्ये या परिसरात समाजकंटकांचा वापर वाढला असून त्यामुळे आसपासचे रहिवासी हैराण झाले आहेत. या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई होत नसल्याने अखेर ‘दिशा’ या संस्थेने न्यायालयात धाव घेतली आहे. या व्यवसायांवर २८ जुलैपर्यंत कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत. परंतु कारवाईबाबत पालिका पातळीवर कोणतीच हालचाल दिसत नाही.
अंधेरीच्या जुहू गल्लीतील औषधाच्या दुकानाला आग लागून वरच्या मजल्यावरील एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. या १३५ अनधिकृत व्यवसायांमुळे आरामनगर वसाहतीमध्येही अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते. या अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी पालिका अधिकारी टाळाटाळ का करीत आहेत, येथे एखादी दुर्घटना घडण्याची पालिका वाट पाहात आहे का, असे सवाल या भागातील रहिवाशांकडून विचारण्यात येत आहे.
शिवसनेच्या खासदारांनाही वाटाण्याच्या अक्षता
स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत अनधिकृत व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना पालिकेला पत्र पाठवून केली आहे. परंतु पालिकेने त्यांच्याही पत्राची दखल घेतलेली नाही. इतकेच नव्हे तर ‘म्हाडा’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट पालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. मात्र तरीही पालिकेचे अधिकारी ढिम्म असून करवाई करण्यात आलेली नाही.