scorecardresearch

मुंबईतील अनधिकृत बांधकामप्रकरणी लवकरच नोटीस ; नवनीत राणा यांच्या वांद्रे येथील घराच्या रचनेत अनियमिततेचा दावा

राणा दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर त्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती

Navneet Ravi Rana
नवनीत राणा व रवी राणा (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे पालिकेच्या पथकाने केलेल्या पाहणीत आढळले आहे. या प्रकरणी पालिकेकडून राणा यांना लवकरच नोटीस पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राणा दाम्पत्याने मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. राणा दाम्पत्य मुंबईत आल्यानंतर त्यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण दिवसभर मुंबईतील वातावरण तापलेले होते. राणा यांच्याविरोधात संपूर्ण शिवसेना रस्त्यावर उतरली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. या दाम्पत्याचे निवासस्थान असलेल्या खार येथील १४ व्या रस्त्यावरील ‘लाव्ही’ इमारतीत पालिकेच्या ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने नोटीस दिली आहे. या इमारतीतील आठव्या मजल्यावर राणा यांची सदनिका असून आठव्या मजल्याची पाहणी करण्यासाठी पालिकेने पूर्वसूचना दिली होती. त्यानंतर सलग दोन दिवस पालिकेच्या पथकाने पाहणीसाठी निवासस्थानाला भेट दिली होती. मात्र त्यांचे घर बंद होते. त्यानंतर पथकाने सोमवारी पुन्हा पाहणी केली असता निवासस्थानात अनधिकृत बांधकामे असल्याचे पथकाला आढळून आले. या प्रकरणी राणा यांना लवकरच पालिका अधिनियमानुसार नोटीस पाठवण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पालिकेचे पथक सोमवारी ९ मे रोजी राणा यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पथकाने निवासस्थानाची पाहणी केली. त्यात काही अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळले, अशी माहिती साहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

मंजूर आराखडय़ाव्यतिरिक्त त्यात बदल केले असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राणा यांना लवकरच १५ दिवसांच्या मुदतीची नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. १५ दिवसांत त्यांना आपले म्हणणे मांडण्याची तसेच या बांधकामासंदर्भात परवानग्यांची कागदपत्रे सादर करण्याची मुदत दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

लीलावती रुग्णालयालाही नोटीस

पालिकेच्या ‘एच-पश्चिम’ विभाग कार्यालयाने लीलावती रुग्णालयालाही नोटीस पाठविली आहे. नवनीत राणा या मानदुखीवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल असताना एमआरआय काढतानाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाली होती. रुग्णालय प्रशासनाने कॅमेरा नेण्यास परवानगी कशी काय दिली, अशा प्रकारची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती. त्यातच सोमवारी माजी महापौर किशोरी पेडणेकर व शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनीही लीलावती रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाब विचारला होता. त्यातच विभाग कार्यालयानेही नर्सिग होम कायद्यांतर्गत रुग्णालयाला नोटीस पाठवली असून एमआरआयला जाताना छायाचित्रे काढणे हे वैद्यकीय नैतिकतेमध्ये बसत नसल्याचे यात म्हटले आहे. तसेच याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून खुलासा मागवण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bmc inspects flat of navneet and ravi rana in khar finds violations zws