महापालिकेकडून २ ते ४ टक्क्यांची सूट

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नापैकी महत्त्वाचा स्रोत असलेली जकात लवकरच बंद होत असल्याने पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. नियोजित वेळेत मालमत्ता कर भरणाऱ्या मुंबईकरांना त्यात सवलत देण्यात येणार आहे. भविष्यामध्ये वेळेत मालमत्ता कर भरणाऱ्यांना दोन ते चार टक्के सवलत मिळणार आहे. मालमत्ता कर वेळेवर भरण्याकडे कल वाढून पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल, असा या योजनेमागे प्रशासनाचा उद्देश आहे.

महापालिकेने मुंबईमध्ये मालमत्ता करासाठीभांडवली मूल्यवर्धित करप्रणाली लागू केली असून, मोठय़ा प्रमाणावर मालमत्ता कराची वसुली व्हावी यासाठी पालिकेने  करदात्यांकरिता विशेष योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. या योजनेमुळे नियोजित वेळेमध्ये मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांची संख्या वाढूू लागल्याचे गेल्या तीन वर्षांमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने २०१७-१८ या वर्षांतही ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३० जून २०१७ पर्यंत अथवा तत्पूर्वी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीतील मालमत्ता कर भरणाऱ्यांना देयकाच्या रकमेत २ टक्के, १ ऑक्टोबर २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळातील मालमत्ता कर भरणाऱ्यांना देयकाच्या रकमेत ४ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१७ या काळातील मालमत्ता कर भरणाऱ्यांना देयकाच्या रकमेत १ टक्का, तर १ ऑक्टोबर २०१७ ते ३१ मार्च २०१८ काळातील कर भरणाऱ्यांना देयकाच्या रकमेच्या ३ टक्के सवलत देण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.

सवलतीचा फायदा तिजोरीला

’ विनाविलंब मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्याला पालिकेतर्फे करसवलत देण्यात येत आहे. या योजनेमुळे २०१३-१४ या वर्षांत ५३,८५२ मालमत्ता धारकांनी नियोजित कालावधीत २७३.२४ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा केले. या मालमत्ताधारकांना पालिकेकडून सुमारे ५.४४ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली.

’  २०१५-१६ या वर्षांत ७५,६५१ मालमत्ताधारकांनी मालमत्ता करापोटी नियोजित वेळेत ४३९.०७ कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा केले असून त्यांना पालिकेकडून ८ कोटी रुपयांची सवलत देण्यात आली आहे.

’  २०१६-१७ या वर्षांमध्ये तब्बल ८९००० मालमत्ताधारकांनी एक हजार कोटी रुपये मालमत्ता कर पालिकेकडे नियोजित वेळेत भरला आणि या मालमत्ताधारकांना पालिकेने तब्बल ११.८० कोटी रुपये सूट दिली.