मुंबईमधील पालिकेची उद्याने, शाळा, पदपथ, स्मशानभूमी आदी ठिकाणी मराठी चित्रपट व मालिकांना चित्रीकरणासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कात ५० टक्के इतकी घसघशीत सवलत देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
चित्रीकरणासाठीच्या परवानगीची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. पूर्वी चित्रीकरणासाठीच्या अर्जाचा विहित नमुनाही नव्हता. आता मात्र पालिकेने तीन पानी अर्ज उपलब्ध केला असून शुल्क आणि अटींचा त्यात समावेश आहे. लवकरच हा अर्ज ऑनलाइनही भरता येणार आहे. पूर्वी शाळांसाठी शिक्षणाधिकारी, स्मशानासाठी उपआरोग्य अधिकारी; याप्रमाणे संबंधित विभाग अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत होती. आता ती पद्धत रद्द करण्यात आली असून शाळा, रस्ते आणि स्मशानभूमीसाठी संबंधित विभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडे अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोबत स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. भायखळ्यातील वीर जिजामाता भोसले उद्यानात चित्रीकण करण्यासाठी संचालक (प्राणिसंग्रहालय) यांच्याकडे अर्ज करावा लागणार आहे. इतर ठिकाणी संबंधित सहाय्यक आयुक्तांना परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यापूर्वी चित्रीकरणासाठी परवानगी देताना सुरक्षा ठेव रक्कम व सफाई आकार घेण्यात येत होता. तोदेखील बंद करण्यात आला आहे.

सुधारित शुल्क
चित्रीकरणासाठी १२ तासांकरिता सरसकट आठ हजार रुपये शुल्क राहील. मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी मात्र ते ५० टक्के सवलतीनुसार चार हजार रुपये राहील. पूर्वी पालिका उद्यानात चित्रीकरणासाठी १.२१ लाख रुपये आकारले जात होते. आता १२ तासांसाठीचे शुल्क ५० हजार रुपये तर मराठीसाठी ते १५ हजार राहील.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.