महापौरांना गेल्या वर्षी आलेल्या निमंत्रणाच्या आधारे पालिकेतील सर्वच पक्षांचे गटनेते तुर्कस्तान दौऱ्यावर गेले असून, गटनेत्यांच्या या दौऱ्याबाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली आहे. पालिकेचा चिटणीस विभाग आणि राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांनीही या दौऱ्याबाबत मिठाची गुळणी घेतली आहे. दरम्यान, आपण सर्वच जण स्वखर्चाने तुर्कस्तानच्या दौऱ्यावर गेल्याचा दावा गटनेत्यांनी केला आहे.
तुर्कस्तानमधील नागरिकांना उपलब्ध करण्यात आलेल्या नागरी सेवांची पाहणी करण्यासाठी गेल्या वर्षी तुर्कस्तानातील स्थानिक स्वराज्य संस्थेने मुंबईच्या महापौरांना आमंत्रण दिले होते. त्यावेळी सुनील प्रभू महापौर होते. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत त्यांना तुर्कस्तानच्या दौऱ्यावर जाता आले नाही. मात्र या निमंत्रणाचे निमित्त साधून सर्वच पक्षांचे गटनेते तुर्कस्तानच्या दौऱ्यावर गेले आहेत. महापौर स्नेहल आंबेकर यांनी मात्र या दौऱ्यावर जाण्यास नापसंती व्यक्त केल्याचे समजते. दरम्यान, स्नेहल आंबेकर अलीकडेच मॉस्कोच्या दौऱ्यावर जाऊन आल्यामुळे गटनेत्यांना तुर्कस्तानची सफर घडविण्यात आल्याची चर्चा पालिकेत सुरू होती. तर गटनेत्यांच्या दालनातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता साहेब गावाला गेल्याचे सांगण्यात येत होते. सर्वच पक्षांतील नगरसेवकांशी संपर्क साधून गटनेत्यांच्या दौऱ्याविषयी विचारणा केली असता, ते कुठे आहेत याची कल्पना नसल्याचे उत्तर मिळाले. गटनेत्यांच्या गुपचूप विदेशगमनाबद्दल नगरसेवक संतप्त झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी व्हिजासाठी १५ नगरसेवकांचे अर्ज आले होते. त्यापैकी पाच-सहा जणांनाच व्हिजा मिळाला आहे. परंतु केवळ व्हिजा मिळवून देण्यासाठी त्यांना मदत केल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने कबूल केले. मात्र सध्या पालिकेतर्फे अधिकृतपणे कोणताही दौरा आयोजित करण्यात आलेला नसून, गटनेते कुठे गेले आहेत, त्याबाबत आपल्याला माहिती नाही, असे सांगत या अधिकाऱ्याने कानावर हात ठेवले.
स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर, समाजवादी पार्टीचे गटनेते रईस शेख, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांचे मोबाइलही गुरुवारी बंद होते. राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ आणि भाजपचे गटनेते मनोज कोटक यांच्याशी मोबाइलवर संपर्क झाला. त्यांनी आपण तुर्कस्तानला असल्याचे प्रामाणिकपणे कबूल केले. तसेच आपण आणि इतर गटनेते स्वखर्चाने तुर्कस्तानला गेल्याचेही स्पष्ट केले. या दौऱ्यासाठी प्रत्येकाने ५० हजार रुपये भरल्याचे धनंजय पिसाळ यांनी सांगितले.