मुंबई : मालमत्ता कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनाने या आठवड्यात विविध विभागांमधील करबुडव्यांच्या २४ मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण चार जेसीबी, एक पोकलेन यासह विविध प्रकारच्या वस्तू आणि साहित्य जप्त करण्यात आले. वरळी येथील शुभदा गृहनिर्माण संस्थेला ३५.९४ कोटी रुपयांचा करभरणा करण्यासाठी ४८ तासांच्या मुदतीची नोटीस बजावण्यात आली आहे.

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, पालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. देय मुदत जवळ येऊनही करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

हेही वाचा : अमोल कीर्तिकर यांच्या प्रचार सभेत दगडफेक, दगडफेक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

एच पूर्व विभागातील जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट लिमिटेडच्या कास्टिंग यार्डवरील ८० कोटी रुपये, जी दक्षिण विभागातील वरळी येथील शुभदा गृहनिर्माण संस्थेवरील ३५.९४ कोटी, रेनिसन्स ट्रस्टचे ६.७२ कोटी रुपयांच्या थकीत करप्रकरणी कारवाई सुरू करण्यात आली आहे. तर, रेनिसन्स ट्रस्टचे चार जेसीबी आणि एक पोकलेन जप्त करण्यात आले. जी दक्षिण विभागातील न्यू शरीन टॉकीजवरील ६ कोटी ४७ लाख रुपयांच्या थकीत करप्रकरणी लिलावाची नोटीस जारी करण्यात आली.

मालमत्तांवर जप्ती

पी उत्तर विभागातील मालाड येथील शांतीसागर रिअॅल्टी प्रायव्हेट लिमिटेडचे भूखंड (१.६५ कोटी), मेसर्स लोक हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे भूखंड (३.९१ कोटी), चेंबूर येथील मेसर्स जी. ए. बिल्डर्सचे भूखंड (१.५ कोटी), ओसवाल हाइट्सचे व्यावसायिक गाळे (२६.४८लाख), फ्लोरा अव्हेन्यूचे व्यावसायिक गाळे (९२.४२ लाख), मेसर्स अरिहंत रिअल्टर्सचे भूखंड (१.९६ कोटी), ई विभागातील मेसर्स प्रभातचा व्यावसायिक गाळा (७२ लाख), हेक्स रिअॅल्टर्सचा व्यावसायिक गाळा (१.१२ कोटी), पी उत्तर विभागातील मालवणी येथील डॉटम रिअल्टीचे भूखंड (१३.०६ कोटी), मालाड येथील क्रिसेंट आदित्य रिअल्टर्स प्रा. लि. चा भूखंड (२.५० कोटी), एच पूर्व विभागातील एन. जे. फिनस्टॉक प्रा. लि.चा व्यावसायिक गाळा (४५.८३ लाख), पी उत्तर विभागातील समर्थ डेव्हलपर्सचा भूखंड (२.३१ कोटी), अजंता कर्मवीर ग्रुपचा भूखंड (२.५ कोटी), डी विभागातील श्रीनीजू इंडस्ट्रीजचे व्यावसायिक गाळे (३.७७ कोटी), एम पश्चिम विभागातील नेत्रावती गृहनिर्माण संस्थेचे भूखंड (६७.५१ लाख), विजया गृहनिर्माण संस्थेचे भूखंड (१.६८ कोटी), जयश्री डी. कावळे (१.६५ कोटी), ई विभागातील सय्यद अकबर हुसैन यांचा व्यावसायिक गाळा (५८.१३ लाख), एफ उत्तर विभागातील बी. पी. टेक्नो प्रॉडक्ट्स प्रा. लि. यांचे व्यावसायिक गाळ्यांवर (४१.५ लाख) जप्तीची कारवाई केली.

हेही वाचा : ठाणेकर अद्वैत नादावडेकरच्या कुंचल्यातून साकारली पंतप्रधानांची भेट, तैलचित्र ठरले लक्षवेधी

२५ मे अंतिम मुदत

कारवाई झालेल्या मालमत्ताधारकांनी पुढील पाच दिवसांच्या आत करभरणा न केल्यास जप्त केलेल्या मालमत्तेची लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील मालमत्ता करभरणा करण्याची अंतिम मुदत २५ मे आहे. मालमत्ताधारकांनी अंतिम देय मुदतीपूर्वी करभरणा न केल्यास त्यांच्यावर कठोर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.