संबंधितांवर न्यायालयात खटला दाखल करण्याचा पालिकेचा निर्णय
न्यायालयाचे आदेश आणि पालिकेने केलेली राजकीय फलकबंदी धाब्यावर बसवून मुंबईत अनेक ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि पराभूत उमेदवारांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर बॅनर्स झळकविले आहेत. परवानगी न घेताच झळकविण्यात आलेल्या बॅनर्सवर कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर बॅनर झळकविणाऱ्याविरुद्ध पालिकेकडून न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. मतदारांचे आभारप्रदर्शन करणाऱ्यांना ही बॅनरबाजी भोवणार आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक २१ फेब्रुवारी पार पडली. त्यानंतर २३ फेब्रुवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत विजयी झालेल्या बहुतांश सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी आपापल्या प्रभागांमध्ये बॅनर्स झळकावून मतदारांचे आभार मानले आहेत, तर पराभूत उमेदवारांनी बॅनर्स झळकावून मतदारांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभारप्रदर्शन केले आहे. आपण पराभूत झालो असलो तरी जनतेची सेवा करीत राहणार, असे आश्वासन या पराभूत उमेदवारांनी बॅनर्सच्या माध्यमातून मतदारांना दिले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर या राजकीय बॅनर्सबाजीला ऊत आला आहे.
राजकीय नेते, कार्यकर्त्यांचे वाढदिवस, पदावर होणारी नियुक्ती, जाहीर सभा, मोर्चे, आंदोलने, धार्मिक कार्यक्रम आदींच्या निमित्ताने मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर बॅनर्स झळकाविण्यात येत होते. या बॅनरबाजीमुळे मुंबई विद्रूप होत असल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने मुंबई बॅनरमुक्त करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. त्याचबरोबर मुंबईत बॅनर्स लावण्याबाबत एक धोरण आखण्याचे आदेशही न्यायालयाने प्रशासनाला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांमध्ये मुंबई बॅनरमुक्त केली होती. तसेच बॅनरबाबत धोरण आखून त्यात राजकीय बॅनर्सना बंदीही घातली होती. पालिकेने राजकीय बॅनरबंदी जाहीर केल्यामुळे सुरुवातीचे काही दिवस राजकीय नेते मंडळी, त्यांचे समर्थक, कार्यकर्ते यांनी या बॅनरबंदीचा धसका घेतला होता. मात्र काही दिवस उलटताच पुन्हा मुंबईमध्ये राजकीय पक्षांकडून जाहीर सभा, बैठका, मोर्चे, आंदोलने याबाबतचे बॅनर्स अधूनमधून झळकविण्यास सुरुवात झाली आहे. पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होताच राजकीय बॅनरबाजीला ऊत आला आहे. प्रभागातील विजयी आणि पराभूत उमेदवारांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी बॅनर्स झळकावून मुंबई विद्रूप करून टाकली आहे. या बॅनर्सची पालिकेने गंभीर दखल घेतली आहे. ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनर्सवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बॅनर्सची छायाचित्रे काढून ती संबंधित पोलीस ठाण्यांना पाठविण्यात येणार आहेत. तसे आदेश पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांतील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बॅनर्स झळकविणाऱ्याविरुद्ध न्यायालयात खटलाही दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या या मंडळींना मतदारांचे आभार मानणे चांगलेच अंगलट येणार आहे.
शहरात राजकीय फलक लावण्यास बंदी आहे. पालिकेची परवानगी न घेता लावलेल्या सर्व फलकांवर कारवाई करण्यात येणार आहे. फलक लावणाऱ्या संबंधितांविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.
– रणजित ढाकणे, पालिका उपायुक्त