पोलादपूरजवळचा ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला आणि समस्त महाराष्ट्रातील जुन्या पुलांची उजणळी झाली. मुंबईमध्ये रेल्वे धावू लागली आणि रेल्वे मार्गामुळे दुभंगणारा भाग जोडण्यासाठी ब्रिटिशांनी लोखंडी खांबाच्या साह्य़ाने पूल उभे केले. त्या काळी या पुलावरून फारशी वर्दळ नव्हती. पण आजघडीला दिवसभर अवजड, हलक्या अशा असंख्य वाहनांचा भार पेलत हे ब्रिटिशकालीन पूल तग धरून उभे आहेत. काही वर्षांपूर्वी धोकादायक बनलेल्या हँकॉक पुलावरून पालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये वाद रंगला होता. अखेर अत्यंत धोकादायक बनलेला हा पूल पाडून टाकण्यात आला. परिणामी, माझगाव परिसरातील रहिवाशांना द्राविडी प्राणायाम घडत आहे. हा पूल कधी बांधणार हे एक प्रश्नचिन्हच आहे. अशीच अवस्था कर्नाक पुलाची झाली आहे. आज या पुलावरून हलकी वाहने धावत असली तरी तोही मरणपंथाला टेकला आहे.
हळूहळू मुंबईतील एकेक ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बनू लागले आहेत. पालिकेला याची जाणीव हँकॉक पूल जमीनदोस्त करताना झाली आणि अखेर पालिकेने मुंबईतील समस्त पुलांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला.
मुंबई महापालिकेला साधारण १५० वर्षांची परंपरा आहे. पण आजघडीला पालिकेकडे मुंबईमधील पुलांचा लेखाजोखा नाही हे सांगूनही खरे वाटणार नाही. मुंबईमध्ये नव्या पुलांची उभारणी आणि नव्या-जुन्या पुलांच्या देखभालीसाठी पालिकेने पूल विभाग स्थापन केला. मुंबईत नाला, रस्ते, मोठे चौक, रेल्वेवरून जाणारे तब्बल २८५ पूल आहेत. पण या पुलांची लांबी, उंची, रुंदी किती, पूल किती साली बांधले, पुलांचे आयुर्मान किती याचा लेखाजोखी पालिका दरबारी नाही, असे पालिकेचे अधिकारीच सांगतात. आता या कामासाठी पालिकेने शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरात सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या सल्लागारांमार्फत मुंबईतील सर्वच पुलांचा अभ्यास करण्यात येणार आहे. पूल किती जुने आहेत, त्यांचे वयोमान, त्यांची दुरुस्ती कधी केली, सध्याची स्थिती काय आदी अभ्यास पूर्ण करून सल्लागार आपला अहवाल पालिकेला सादर करणार आहेत. त्यानंतर कोणत्या पुलांची दुरुस्ती करावयाची याचाही निर्णय पालिका घेणार आहे. इतक्या वर्षांनी का होईना पण पालिकेला मुंबईतील पुलांबाबत जाग आली हे काही थोडके नाही.
ब्रिटिशांनी अनेक भागांमध्ये रेल्वे मार्गावर पूल उभे केले. माझगाव, कर्नाक, महालक्ष्मी, रे रोड, दादर यासह अनेक भागांतील लोखंडी आणि दगडी बांधकामाचे पूल आपल्या दृष्टीस पडतात. पण कालपरत्वे हे पूल म्हातारे झाले आहेत. रेल्वे आणि पालिकेने समन्वय साधत काही पुलांची छोटी-मोठी दुरुस्ती केली. गंजलेला लोखंडी भाग बदलण्यात आला. पुलांवर डांबरीकरणही केले. पण आजघडीला या पुलांवरून धावणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता ही दुरुस्ती केवळ मलमपट्टी ठरत आहे. पावसाळ्यात अनेक पुलांवरून गळती होत आहे. पुलांचे मुख्य आधारस्थंब ठरणारे लोखंडी खांब गंजू लागले आहे. काही खांबांच्या पोकळीमध्ये गर्दुल्ल्यांनी आपले किडुकमिडुक सामान दडवून ठेवले आहे. अनेक ठिकाणचे पूल बेघर असलेल्यांचे आश्रयस्थाने बनले आहेत. परंतु या समस्यांकडे लक्ष द्यायला ना पालिकेला वेळ ना रेल्वे प्रशासनाला. या पुलांचे आयुर्मान वाढवून त्यांचे जतन करण्यासाठी प्रथम पालिका आणि रेल्वेला परस्परांमध्ये समन्वय साधण्याची गरज आहे.
पालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे हँकॉक पुलाची पाडणी आणि उभारणीबाबत झालेल्या वादावरून दिसून आहे. आता दादरच्या टिळक पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खालून रेल्वे धडधडत जाऊ लागताच टिळक पुलाला हादरे बसू लागले आहेत. त्यामुळे तातडीने या पुलाची दुरुस्ती करण्याची गरज आहे. पालिकेने पुलाच्या दुरुस्तीसाठी रेल्वेला पैसेही दिले आहेत. पण दोन वर्षे झाली तरी टिळक पुलाच्या दुरुस्तीला मात्र सुरुवात झालेली नाही. हा पूल पडून दुर्घटना झाल्यावर रेल्वेला जाग येणार का असा प्रश्न दादर परिसरातील रहिवाशी विचारू लागले आहेत. केवळ एक-दोन पुलांची पुनर्बाधणी आणि दुरुस्तीच्या प्रश्नाचे घोंगडे अद्यापही भिजतच पडले आहे. पालिका आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे अंगुलिनिर्देश दाखवित वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहेत. दिवसेंदिवस पुलांची परिस्थिती बिकट बनत चालली असताना पालिका आणि रेल्वेमधील समन्वयाच्या अभावामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने घातक बनत चालले आहे. जोपर्यंत या दोन्ही यंत्रणा एकत्र येऊन जुन्या दगडी पुलांचा ठेवा जपण्याविषयी विचार करणार नाहीत, तोपर्यंत पुलांच्या स्थितीत बदल घडणार नाही. अन्यथा रेल्वे मार्गावरून धडधडत धावणाऱ्या रेल्वेच्या हादऱ्यांमुळे एकादा पूल कोसळेल आणि त्यात नाहक मुंबईकरांचे बळी जातील.