‘प्रभाग’फेरी – ‘बी’ विभाग
अंतर्गत भाग: इमामवाडा, डोंगरी, उमरखाडी, दाणा बंदर, वाडी बंदर, बेंगालीपुरा, प्रिन्सेस डॉक, मुसाफिरखाना, व्हिक्टोरिया डॉक, मांडवी, पायधुनी.
एके काळी हा विभाग कुख्यात गुंड करीमलाला, दाऊद इब्राहिम, हाजी मस्तान यांच्या दहशतीखाली होता. मात्र टोळीयुद्ध आणि पोलिसांनी केलेली कारवाई यामुळे या गुन्हेगारी टोळ्या नेस्तनाबूत झाल्या. दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती, वाहतुकीच्या गोंधळात हरवलेला परिसर म्हणून या विभागाची ओळख आहे. मुंबईमधील मोठय़ा बाजारपेठा याच परिसरात विसावल्यात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा विभाग मानला जातो. भाऊचा धक्का हे या विभागातील मुख्य आकर्षण. रेवस आणि उरण येथे जलमार्गे जाणाऱ्या प्रवाशांचा तेथे प्रचंड राबता असतो. त्याशिवाय मासेमारी करणाऱ्या अनेक बोटी भाऊच्या धक्क्यावरून खोल समुद्रात जातात आणि मासे घेऊन माघारी परततात. बालगुन्हेगारांचे बालसुधारगृह याच भागात आहे. या परिसरातील मुख्य आकर्षण म्हणजे मिनार मशीद. रमजानच्या महिन्यामध्ये मिनार मशिदीचा आसपासचा परिसर उजळून जातो. मशिदीलगतच्या गल्ल्यांमध्ये लागणाऱ्या स्टॉल्सवर खाद्यपदार्थाची चव चाखण्यासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून खवय्ये येत असतात. या सर्व वैशिष्टय़ांमुळेच या विभागाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.
* वाहतूक कोंडी
या परिसरात मुख्य बाजारपेठा असल्यामुळे वाहतूक कोंडी या विभागाच्या पाचवीलाच पुजली आहे. सतत अवजड वाहनांची ये-जा, घाऊक व्यापाऱ्यांच्या गोदामांमध्ये माल उतरविण्यासाठी उभी राहणारी वाहने, छोटे-मोठे किरकोळ व्यापारी, ग्राहक, दलाल आदींची गर्दी यात येथील रस्ते हरवून गेले आहेत. हातगाडय़ांचा वावर हा पादचाऱ्यांची डोकेदुखी बनला आहे.
* मोडकळीस आलेल्या इमारती
या भागात अनेक इमारती दाटीवाटीने उभ्या आहेत. त्यापैकी बहुसंख्य इमारती मोडकळीस आल्या आहेत. जागांचे गगनाला भिडलेले भाव आणि निवासाची पर्यायी चांगली व्यवस्था नसल्याने असंख्य रहिवाशी धोकादायक इमारतीतच ठिय्या मांडून बसले आहेत. पुनर्विकासात घर रिकामे केल्यानंतर याच जागी नवी इमारत किती वर्षांत उभी राहील याची शाश्वती नाही हेही एक त्यामागील कारण आहे.
* अनधिकृत इमारती
या भागातील इमारतींवर मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत मजले चढविण्यात आले आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली संपूर्ण इमारत पाडून १०-११ मजल्यांच्या नव्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्याविरोधात पालिकेने लढाई सुरू केली आहे. मात्र ही लढाई लढणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
* वाहने उभी करण्यासाठी जागेचा अभाव
वाहने उभी करण्यासाठी या परिसरात पुरेशी व्यवस्थाच नाही. परिणामी, रस्त्यालगत उभी असलेली वाहने, वाहतूक कोंडी ही पादचाऱ्यांच्या दृष्टीने मोठी समस्याच बनली आहे.
* एकमेव शौचालय
पायधुणी परिसरात पालिकेचे केवळ एकमेव सार्वजनिक शौचालय आहे. बाजारपेठांमध्ये मोठय़ा संख्येने ग्राहक येत असतात. त्यामुळे या भागात सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता आहे. सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था नसल्याने नागरिकांची प्रचंड कुचंबणा होत आहे.
* नियमांना हरताळ
या परिसरात नियम धाब्यावर बसविण्याची प्रवृत्ती आढळून येते. सिग्नल यंत्रणा असूनही ती नसल्यासारखीच आहे. वर्दळीतूनही बेफाट वाहने हाकणाऱ्यांची संख्या मोठी असून वाहनचालकांच्या दहशतीमुळे वाहतूक पोलिसांना केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागते.
* कचऱ्याने भरलेल्या घरगल्ल्या
दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींमधील घरगल्ल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यातूनच घराघरांत जाणाऱ्या जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून त्यामुळे दूषित पाणीपुरवठय़ाला आमंत्रण मिळत आहे. घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन पालिकेकडून वारंवार करण्यात येते; परंतु रहिवाशांमध्ये सुधारणा होत नसल्याने घरगल्ल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. मनुष्य आत जाऊ शकणार नाही, इतक्या लहान घरगल्ल्या असल्याने तेथे सफाई करणेही कामगारांना अवघड होत आहे. कचऱ्याच्या साम्राज्यामुळे घुशींचा वावर आणि डासांचा प्रादुर्भाव होत आहे. त्यापाठोपाठ अधूनमधून आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत.
मुस्लीम मतांसाठीची रस्सीखेच
‘बी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील अनेक विभाग मुस्लीमबहुल आहेत. काही वर्षांपूर्वी समाजवादी पार्टीचा या परिसरात दबदबा होता. मात्र काँग्रेसने समाजवादी पार्टीला खिंडार पाडले. अनेकांनी समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपसूकच या भागात काँग्रेसची ताकद वाढत गेली. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या मतपेढीवर काँग्रेस अधिराज्य गाजवीत होते. त्याच्याच बळावर काँग्रेसने पालिकेच्या मागील निवडणुकीत ‘बी’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील तिन्ही प्रभागांवर ‘हाता’ची मोहर उमटवली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. समाजवादी पार्टीने पुन्हा या भागावर आपले लक्ष केंद्रित केले आहे, तर ‘एआयएमआयएम’चे नवे आव्हान काँग्रेस व समाजवादी पार्टीपुढे आहे.
सध्याचे नगरसेवक
* प्रभाग – २२१
नगरसेवक – ज्ञानराज निकम, काँग्रेस
* प्रभाग – २२२
नगरसेवक – वकारुन्नीसा अन्सारी जाहिद हुसेन, काँग्रेस
* प्रभाग – २२३
नगरसेवक – जावेद जुनेजा, काँग्रेस
फेररचनेनंतरची प्रभाग रचना
* प्रभाग २२३
आरक्षण – सर्वसाधारण महिला
लोकसंख्या – ६३,०४५
प्रभाग क्षेत्र – उमरखाडी, दाणाबंदर, प्रिन्सेस डॉक, वाडीबंदर
* प्रभाग २२४
लोकसंख्या – ६४,२४५
आरक्षण – नागरिकांचा मागासवर्ग (महिला)
प्रभागक्षेत्र – व्हिक्टोरिया डॉक, बेंगालीपुरा कोळीवाडा, मांडवी, पायधुणी
या परिसरात दाटीवाटीने इमारती उभ्या असून इमारतींदरम्यान तब्बल ९९० घरगल्ल्या आहेत. रहिवाशी याच घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकत असून त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दुकानदारांनी पदपथावर केलेली अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाले यांच्यामुळे चालायला रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने आणि धाब्यावर बसविण्यात येणारे वाहतुकीचे नियम यामुळे या परिसरात सावळा गोंधळ आहे. मोठय़ा कंपन्या मरिन ड्राइव्ह, नरिमन पॉइंट, चर्चगेट अशा विभागांत सुशोभीकरण करण्यासाठी पुढाकार घेतात; परंतु काळबादेवी, भुलेश्वर, डोंगरी अशा भागांना सुशोभीकरणाची गरज आहे. भातबाजार ही व्यापाऱ्यांची पंढरी म्हणावी लागेल. दररोज तेथे कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते; परंतु सुविधांच्या नावाने तेथे सुकाळ आहे.
डॉ. उत्तनवाला सादिक, ‘हेल्प’ सामाजिक संस्था
दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती, वाहतुकीचा उडालेला बोजवारा, अनधिकृत बांधकामे आदींमुळे या परिसराची पुरती वाट लागली आहे. या विभागातील मैदानांकडे लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे दुर्लक्ष झाले असून मैदानांची दैना झाली आहे. डासांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर विभागामध्ये पाहिजे तितक्या प्रमाणात धूम्रफवारणीही होत नाही.
कमलेश भोईर, उमरखाडी
कोणतीही नागरी कामे योग्य पद्धतीने केली जात नाहीत. खोदलेले रस्ते किंवा पावसात पडलेले खड्डे योग्य पद्धतीने बुजवले जात नाही. त्यामुळे रस्ते ओबडधोबड होतात आणि त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. अशीच अवस्था पदपथांचीही आहे. सफाई करणारे कामगारही रस्ता निम्मा झाडून झाला की गायब होतात.
गुलाम मोहम्मद करीम शेख, समाजसेवक