डोंबिवलीत रासायनिक टँकरच्या स्फोटामुळे गोदामातील इतर टँकरही हवेत उडून जवळच्या चाळीवर आदळल्याने तीन चाळी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. स्फोटामुळे उडालेले पत्र्याचे तुकडे एमआयडीसीतील ५०० मीटरवर असलेल्या मिलापनगर, सुदर्शननगर भागात येऊन पडले आणि परिसरात एकच घबराट पसरली.
गोदामात स्फोट झालेल्या टँकरच्या मालकाचा आता शोध सुरू झाला आहे. त्या टँकरमधून यापूर्वी कोणते रसायन वाहून नेण्यात आले होते. मालकाने हा टँकर भंगारात देताना तो स्वच्छ केला होता की नाही हे स्पष्ट झाल्यानंतर खरा आरोपी पुढे येणार आहे. कारखाना निरीक्षकांनी या प्रकरणाची नि:ष्पक्ष चौकशी केली पाहिजे, अशी नागरिकांची मागणी आहे.
स्फोटानंतर गोदामात आग लागली. खिडक्यांची तावदाने फुटली. स्फोट, आग आणि धुराच्या लोटांमुळे परिसरातील रहिवासी हादरून गेले. शिळफाटा रस्त्यावरील वाहने स्फोटाच्या दणक्याने चालकांनी काही काळ एकाच जागी थांबवली. अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर नागरिकांनी स्फोटाच्या ठिकाणी धाव घेतली.
कल्याण डोंबिवली परिसरात मात्र बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पसरली होती. मानपाडा पोलिसांनी या स्फोट प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
निव्वळ सुदैव!
एरवी इथे लहान मुले खेळत असतात. बायकाही गप्पा मारत बसलेल्या असतात. पण केवळ सुदैवानेच शुक्रवारी तिथे कोणी नव्हते. एखाद्या महाकाय फुटबॉलप्रमाणे तो अजस्र बॉयलर चाळीच्या मध्यभागी, घरांच्या दोन रांगांच्या मधोमध पडूनही कोणाच्या प्राणावर बेतले नाही. चार-पाच घरांची पडझड आणि काही घरांना भेगा गेल्या. पण तेवढय़ावरच निभावले. हा बॉयलर १० फूट लांब आणि सुमारे ६ फूट रुंद आहे.
३० वर्षे जुन्या या चाळीचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच आहे. बहुतांश तेलुगू भाषकांचे येथे वास्तव्य आहे. येथील १५ ते १६ घरांपैकी अनेक खोल्या भाडय़ाने देण्यात आल्या आहेत. १० बाय ४० आकारातील या खोल्या एकमेकांना लागून आणि अ‍ॅसबेस्टॉस पत्र्यांच्या छताच्या आहेत. सकाळी येथील मुले शाळेत गेली होती. तर मोठी माणसे कामावर निघून गेली होती. चाळीच्या मागेच असलेल्या भंगार गोदामात स्फोट झाला आणि हा महाकाय बॉयलर उडून येथे येऊन पडला. चाळीपासून हे गोदाम तब्बल १०० मीटरवर आहे. चाळीजवळून जाणाऱ्या २० फूट उंचीवरील वीजवाहक तारा ओलांडून हा बॉयलर येऊन पडला हे विशेष.
या बॉयलरने नरसय्या मोलगू यांच्या घराचा ठाव घेतला. त्यांचे घर जमीनदोस्तच झाले. सुदैवाने त्यांच्या कुटुंबातील कोणीच घरात नव्हते. त्यांच्या शेजारचे अबान्द रगाला यांचे घरही पूर्ण उद्ध्वस्त झाले. मात्र त्यांचेही  कुटुंब गावाला गेल्याने जीवितहानी झाली नाही. जवळच्या घरातच १० वर्षांचा मनोज अभ्यास करत बसला होता. त्याला किरकोळ दुखापती झाल्या.
सकाळचे ९.३०-९.४५ झाले असतील. अचानक अगदी कानाजवळ फटाका फुटल्यागत आवाज आला आणि क्षणात डोळ्यासमोर छत आणि त्याचबरोबर माती खाली अख्ख्या स्वयंपाकाच्या ओटय़ावर पडू लागली. तेवढय़ात बाहेरही धडधड, धडाम आवाज झाला. घराबाहेर पडतो तो चाळीचा रस्ताच बंद. एखाद्या मोठय़ा फुटबॉलसारखी वस्तू दारात येऊन पडली होती. सावरताच लक्षात आले. आपण वाचलो. एका मोठय़ा अपघातातून.. अशी प्रतिक्रिया याच चाळीत राहणाऱ्या मिश्रा यांच्या घरातील महिलेने दिली.