मुंबईत सुरू असलेल्या एका पॉर्न चित्रपट निर्मिती आणि पॉर्न अॅप प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केली आणि खळबळ उडाली. सध्या राज कुंद्रा कोठडीत असून, व्हॉट्स अॅपवरून झालेल्या चॅटमुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक माहिती समोर येताना दिसत आहे. पॉर्न अॅप हॉटशॉट प्ले स्टोअरवरून हटवण्यात येणार असल्याची कल्पना राजला होती आणि त्यामुळेच त्याने दुसरा मोठा प्लॅनही तयार केला होता. व्हॉट्स अॅप चॅटमधूनच हे बिंग फुटलं आहे.
गुगल प्ले स्टोरने राजच्या पॉर्नोग्राफी कंटेट पुरवणाऱ्या हॉटशॉट अॅपला हटवल्यानंतर राज कुंद्रा इंग्लडमधील कायद्याला धरून दुसरं अॅप लाँच करण्याच्या तयारीत होता, अशी माहिती समोर आली आहे. ‘इंडिया टूडे’नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रिनशॉट शेअर केले आहेत. हॉटशॉट अॅप व्यवहाराची चर्चा करण्यासाठी राज कुंद्राने ‘H Account’ नावाचा एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपमध्ये या अॅपबद्दल सर्व चर्चा केल्या जायच्या. चॅटमधील मेसेजेसनुसार, ‘ह़ॉटशॉट अॅप’वरून कुंद्राला चांगली कमाई होत होती. मात्र, अडल्ट कंटेट असल्यानं ‘गुगल प्ले स्टोर’नं हे अॅप हटवलं होतं.
राज कुंद्राच्या या ग्रुपमध्ये प्रदीप बक्षी नावाचा एक व्यक्ती होता. त्याने हॉटशॉट अॅप का हटवले याबद्दल गुगल प्ले स्टोरनं दिलेला रिव्ह्यू शेअर केला होता. त्यावर राज कुंद्राने रिप्लाय केलेला आहे. राज कुंद्रा म्हणतो, “ते ठीक आहे. आपला प्लॅन बी तयार असून पुढच्या २-३ आठवड्यात नवीन अॅप सुरू होईल. हे अॅप ios आणि Android दोन्हीमध्ये काम करेल,” असं तो ग्रुपमधील सर्वांना सांगतो.
या संभाषणादरम्यान, “नवीन अॅप लॉन्च होईपर्यंत, ते सर्व बोल्ड फिल्म्स डिअॅक्टिव्हेट करू शकतात आणि प्ले स्टोअरमध्ये त्यासाठी अपिल करू शकतात,” असं रॉब डिजिटल मार्केटिंग हॉटशॉट्स नावाच्या सदस्यानं इतरांना सूचवलेलं होतं. तर दुसऱ्या स्क्रिनशॉटमध्ये एका सदस्यानं राज कुंद्राला सांगितलं की, “बॉली फेम सुरू होईपर्यंत हॉटशॉट अॅप कसं टिकवून ठेवता येईल, यासाठी मार्ग शोधायला हवेत.” दुसऱ्या एका चॅटमध्ये राजने ओटीटी प्लॅटफॉर्मवर झालेल्या कारवाईबद्दल मत मांडलेलं आहे. तसेच थँक गॉड तुम्ही बीएफ (बॉली फेम) प्लॅन केलं, असं म्हटलेलं आहे. ‘बॉली फेम’ हे अॅप राज कुंद्राचा प्लॅन बी होता. त्यासाठी राज लोगो तयार करायला लावत होता आणि अॅपसाठीची इतर कामे करत होता.
प्रदीप बक्षीने तयार केलेल्या बॉली फेम नावाच्या दुसऱ्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपचा राज कुंद्रा सदस्य होता. या चॅटच्या स्क्रिन शॉट्सनुसार, बॉली फेम हे अॅप पूर्णपणे इंग्लडमधील कायद्यावर आधारित अॅप तयार करण्यात यावे, असं राजला वाटत होतं. जेणेकरून त्याला भारतीय कायदे लागू होणार नाहीत आणि राजला कोणतीही अडचण येणार नाही. तसेच राज कुंद्राने इंग्लडमधील कायद्यांवर आधारित बॉली फेमसाठी ७+, १२+, १६+ आणि १८+ वयोगटातील कंटेट तयार करण्याची योजना तयार केली होती,’ असेही या स्क्रिनशॉट्समधील चॅटमधून समोर आलं आहे. राज कुंद्रासोबत अटक करण्यात आलेला दुसरा आरोपी रायन थोरपे हा देखील या ग्रुपमध्ये होता. तो कुंद्राच्या सूचनेनुसार डोमेन, ईमेल, पत्ता आणि इतर गोष्टी पाहत होता.