२४ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईचे आदेश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : आधी संस्थेचे बेकायदा फलक लावणे आणि नंतर हे फलक उतरवण्यास गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी धमकावणे-मारहाण  करणे अंधेरी पूर्व येथील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांना चांगलेच महागात पडले आहे.  मारहाणीची संपूर्ण जबाबदारी पटेल यांनी स्वीकारत त्याबाबत बिनशर्त माफीनामा बुधवारी उच्च न्यायालयात सादर केला. एवढेच नव्हे, तर नुकसानभरपाई म्हणून पटेल यांना २४ लाख रुपये दोन महिन्यांत पालिकेकडे जमा करावे लागणार आहेत.

न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत पटेल यांनी वकील प्रसाद ढाकेफळकर यांच्यामार्फत माफीनामा तसेच भविष्यात बेकायदा फलकबाजी करणार नाही, ती करण्यास प्रोत्साहन देणार नाही आणि करणाऱ्यांविरोधात तक्रार करेन याबाबतचे हमीपत्र सादर केले. हे बेकायदा फलक लावण्यात आले तेव्हा आणि ते उतरवले जात असताना आपण तेथे नव्हतो. तरी या सगळ्याची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्याची नुकसानभरपाई म्हणून पालिकेला २४ लाख रुपये देण्यास तयार असल्याचे पटेल यांनी न्यायालयाला सांगितले. एखाद्या लोकप्रतिनिधीला बेकायदा फलकबाजीप्रकरणी अशाप्रकारे भरुदड सहन करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

न्यायालयानेही पटेल यांचे हे हमीपत्र दाखल करून घेतले. मात्र त्यांच्याविरोधात पालिकेने दाखल केलेली अवमान याचिका नुकसानभरपाईची पूर्ण रक्कम जमा होईपर्यंत निकाली काढण्यास नकार दिला. त्याच वेळी नुकसानभरपाईची रक्कम पालिकेकडे जमा करण्यास न्यायालयाने पटेल यांना दोन महिन्यांची मुदत दिली आहे. एवढेच नव्हे, तर दुसरीकडे न्यायालयाने पटेल यांना आठवडय़ातून एक दिवस संपूर्ण विभागाला भेट देऊन कुठे आणि कुणी बेकायदा फलक लावले आहेत याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. पटेल यांनी नुकसानभरपाईची रक्कम जमा केल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांना बेकायदा फलक उतरवताना मारहाण झाली. त्यांना या रकमेपैकी योग्य ती रक्कम द्यावी. तसेच उर्वरित रक्कम योग्य कारणासाठी उपयोगात आणावी, असे आदेशही न्यायालयाने पालिका आयुक्तांना दिले आहेत.

बिनशर्त माफी

बेकायदा फलक लावू नयेत आणि सरकारी कामात अडथळा आणू याची लोकप्रतिनिधी म्हणून पटेल यांना पूर्ण जाणीव होती. त्यानंतरही त्यांनी त्याचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांना दया दाखवली जाऊ  नये, असे पालिकेच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र पटेल यांनी सगळ्याची जबाबदारी घेत बिनशर्त माफी मागितलेली आहे. त्याचाच भाग म्हणून ते पालिकेकडे २४ लाख रुपये जमा करणार आहेत. शिवाय भविष्यात या सगळ्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि बेकायदा फलकांबाबत पालिकेत तक्रार करू, असे हमीपत्र पटेल यांनी दिल्याने त्यांना दया दाखवली जात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bombay hc order bjp corporator to pay 24 lakh penalty for illegal hoarding
First published on: 22-03-2019 at 02:43 IST