मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीनिमित्त १३,५०० रुपये बोनस देण्याची घोषणा महापौर स्नेहल आंबेकर यांनी शुक्रवारी केली. कर्मचाऱ्यांच्या बोनसपोटी पालिकेच्या तिजोरीवर १६९ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात कर्मचाऱ्यांच्या हाती बोनसची रक्कम पडणार आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून बोनस देण्याबाबत महापौरांच्या दालनात शुक्रवारी गटनेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना १२,५०० रुपये बोनस देण्याचा प्रस्ताव सादर केला होता. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांना १३,००० रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र यंदा कर्मचाऱ्यांच्या संख्येत १० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे गेल्या वर्षी इतका बोसन देणे शक्य नसल्याचे आयुक्त अजय मेहता यांनी या बैठकीत स्पष्ट केले. मात्र गटनेत्यांनी गेल्या वर्षीपेक्षा अधिक बोसन देण्याची मागणी वारंवार केल्यामुळे अखेर १३,५०० रुपये देण्याची तयारी आयुक्तांनी दर्शविली. त्यामुळे सुमारे १,१७,५२१ कर्मचाऱ्यांना १३,५०० रुपये बोनस मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bonus to bmc servants
First published on: 24-10-2015 at 00:33 IST