सोशल नेटवर्किंग साईटमध्ये आघाडीवर असलेल्या ‘फेसबुक’वर ज्येष्ठ साहित्यिक-कथाकथनकार व. पु. काळे यांनी लिहिलेल्या कथांमधील काही चांगली वाक्ये ‘शेअर’ केली जातात तर महाविद्यालयीन किंवा अन्य एकांकिका स्पर्धेतून आजही ‘वपुं’च्या चार ते पाच कथांवर नाटके सादर केली जातात. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसाठी ‘वपुं’ची पुस्तके ‘प्लेझर बॉक्स’ ठरली आहेत. मेहता पब्लिशिंग हाऊसनेही ‘वपुं’च्या सर्व पुस्तकांचा संच सवलतीत उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.  
‘वपुं’च्या ८१ व्या जयंतीनिमित्त २५ मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्र, दादर (पूर्व) येथे ‘वपु-एक अमृतानुभव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वपुं’ची कन्या स्वाती चांदोरकर यांची निर्मिती असलेल्या कार्यक्रमास ‘स्वर्णमध्य’चे सहकार्य लाभले आहे.
आज इतक्या वर्षांनंतरही नवीन पिढी ज्यात तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठय़ा प्रमाणात समावेश आहे, ते अनेक जण वपुंच्या पुस्तकांचे चाहते आहेत, यावरून त्यांचे लेखन हे कालातीत असल्याचे सिद्ध होते. महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांकडून विविध एकांकिका स्पर्धेसाठी आजही बापुंच्या कथांवर एकांकिका सादर केल्या जातात,  असे ‘वपुं’च्या कन्या स्वाती चांदोरकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
वपुंच्या ८१ व्या जयंतीनिमित्त सोमवारी सादर होणाऱ्या कार्यक्रमात संपदा कुलकर्णी-जोगळेकर, मिलिंद सफई, रेखा मुंदडा आणि ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे सहभागी होत आहेत. कथाकथन, पत्रसंवाद, अनुभव कथन, ध्वनिपट सादरीकरण असे या कार्यक्रमाचे स्वरूप असल्याचे चांदोरकर म्हणाल्या.
दरम्यान वपुंच्या सर्व छापील पुस्तकांचे अधिकार मेहता पब्लिशिंग हाऊसकडे असून त्यांच्या जयंतीनिमित्त  पुस्तक संचावर खास सवलत जाहीर केली आहे. येत्या ३१ मार्च पर्यंत ही सवलत असून ५ हजार ८००  रुपये मूळ किंमतीचा हा संच सवलतीमध्ये ३ हजार ८०० रुपयांना मिळणार आहे. संच खरेदीवर स्वाती चांदोरकर लिखित ‘वपु’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार असून संचातील स्वतंत्र पुस्तक खरेदीवर १५ टक्के सवलत देण्यात येणार आहे.