व्यासपीठावर स्थान नसल्याने नाराजी; पंतप्रधान-पवार एकत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत ‘मेक इन इंडिया’ च्या उद्घाटन समारंभात व्यासपीठावर बसण्यासाठी आमंत्रणच नसल्याने चिडलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी यांना ठाकरे यांची ‘अ‍ॅलर्जी’ असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ते मुंबईत शनिवारी एका व्यासपीठावर बसणार आहेत.
ठाकरे यांनी ‘मेक इन इंडिया’ वर बहिष्कार टाकल्यास राज्य सरकारची पंचाईत होईल हे ओळखून ठाकरे यांचे मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकराचे प्रयत्न केले, पण त्यास यश आले नाही. गिरगाव चौपाटीवर होणाऱ्या करमणुकीच्या कार्यक्रमास आणि ‘मेक इन मुंबई’ या एका चर्चासत्रास उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन वांद्रे-कुर्ला संकुलात केले जाणार असून वरळीतील क्रीडाकेंद्रात सायंकाळी मोदी यांचा जाहीर कार्यक्रम आहे. पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाच्या वेळी राजशिष्टाचार असतो. त्यामुळे ठाकरे यांना पंतप्रधान मोदींसमवेत व्यासपीठावर बसविता येणार नाही, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. भाजपकडून ठाकरे यांना जाणीवपूर्वक सन्मान राखला जात नाही, असे शिवसेना नेत्यांना वाटत आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधानपदी असताना १९९५-९६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि ते पंतप्रधान वाजपेयी यांच्याशेजारी व्यासपीठावर बसले होते. पंतप्रधानांची इच्छा असली तरी आणि त्यांनी निर्णय घेतला तर व्यासपीठावर कोणालाही आमंत्रित केले जाऊ शकते. शिवसेना हा ‘रालोआ’चा (एनडीए) जुना सहकारी पक्ष असून उद्धव ठाकरे यांना मात्र मोदी किंवा भाजप अध्यक्ष अमित शहा हे फारशी किंमत देत नाहीत. ज्येष्ठ भाजप नेते वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन हे नेते ठाकरे यांचा योग्य सन्मान राखत असत आणि व्यासपीठावर निमंत्रण असे. तेव्हा राजशिष्टाचार आड आला नाही आणि तो आता कसा काय येतो,असा शिवसेनेचा सवाल आहे.
त्यामुळे मोदी यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार कोणती भूमिका घेणार, याविषयी चर्चा सुरु झाली आहे. मोदी यांच्याकडून सन्मान राखला जात नसताना गिरगाव चौपाटीवरील करमणुकीच्या आणि ‘मेक इन मुंबई’ च्या चर्चासत्रास मात्र ते उपस्थित राहणार आहेत. ठाकरे हे सोमवारी दुपारी चार वाजता वांद्रे-कुर्ला संकुलात जाऊन सर्व दालनांची पाहणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एका व्यासपीठावर
पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर येत नसले तरी पंतप्रधान मोदी हे बाँबे आर्ट सोसायटीच्या कार्यक्रमानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत १३ फेब्रुवारीला एका व्यासपीठावर असतील. हा खासगी संस्थेचा कार्यक्रम असून त्यास राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता उपस्थित राहणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Boycott narendra modi from uddhav thackeray
First published on: 12-02-2016 at 03:03 IST