पवईत उगम पावून माहीम कॉजवे जवळ समुद्रात विलीन होणाऱ्या मिठी नदीत आसपासच्या ४३ वस्त्या आणि एमआयडीसीमधून सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे मिठी नदी मलीन झाली आहे. ही नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी खास वाहिन्या टाकून वस्त्यांमधील सांडपाणी खोल समुद्रात सोडा, तसेच नदी काठी ‘सव्‍‌र्हिस रोड’ बांधण्यासाठी एका आठवडय़ात झोपडपट्टय़ा जमीनदोस्त करा, त्यात अडथळा निर्माण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना तुरुंगात धाडा, असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. तसेच येत्या दोन वर्षांत मिठी नदी पर्यटनस्थळ बनेल अशी मुक्ताफळे त्यांनी सोमवारी उधळली. इतकेच नव्हे तर एप्रिलअखेर मिठी नदी निर्मळ पाण्याने झुळूझुळू वाहायला लागेल आणि पावसाळ्यात मुंबईकरांना मिठी नदीत कारंजी उडताना दिसतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
समुद्र आणि मिठी नदीच्या माहीम कॉजवे येथील संगमापासून थेट पवई येथील उगमस्थानापर्यंतच्या परिसराची पाहणी करण्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम, महापौर स्नेहल आंबेकर यांचा दौरा सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या वेळी एमएमआरडीए आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. महापौर निवासातून निघालेला कदम, आंबेकर यांचा लवाजमा माहीम कॉजवेवर पोहोचल्यानंतर प्रवाहामध्ये अडथळा ठरणारा काठालगतचा भराव हटविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यानंतर वांद्रे-कुर्ला येथे वाकोला नदी व मिठी नदीचा संगम, कुर्ला येथील एमटीएनएल पूल, सीएसटी पूल, सफेद पूल परिसरातील मिठी नदीचा आढावा पर्यावरण मंत्र्यांनी घेतला. यावेळी आमदार तुकाराम काते, अशोक पाटील, संजय पोतनीस, विभागप्रमुख भाऊ कोरगावकर आदी उपस्थित होते.
मिठी नदी काठी १८०० बांधकामे असून ती तात्काळ जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू करावी. सेवा रस्त्यामध्ये बाधा ठरणाऱ्या बांधकामांविरुद्ध एक आठवडय़ात कारवाई करावी. पात्र-अपात्र झोपटपट्टीधारकांची यादी तयार करून पात्र झोपडपट्टीवासियांची व्यवस्था करण्यात येईल. झोपडपट्टी दादांची दादागिरी मोडून काढण्यात येईल. झोपडपट्टय़ांविरुद्ध कारवाई करताना अडथळा निर्माण करणाऱ्या लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा रामदास कदम यांनी दिला. मिठी नदीलगतच्या ४३ ठिकाणांहून सांडपाणी नदीतच सोडले जात आहे. त्यामुळे मिठी प्रदुषित झाली आहे. या सांडपाण्याचा बंदोबस्त करण्याची गरज असून तातडीने हे सांडपाणी मलनिस्सारण वाहिन्यांमध्ये अथवा खास वाहिन्या टाकून खोल समुद्रात सोडावे. त्याबाबत तातडीने उपाययोजना करावी, असे आदेश कदम यांनी दिले. दरम्यान, मिठी काठालगतच्या बांधकामांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, तर काही बांधकामांवर न्यायालयाची स्थगिती आहे. ही वस्तुस्थिती अधिकारी समजावून देत असतानाही कारवाई करण्याचे घोडे रामदास कदम पुढे दामटवित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Break down huts to make clear mithi river says environment minister
First published on: 20-01-2015 at 02:33 IST