चर्नीरोड येथील तारापोरवाला मत्स्यालयात येत्या काळात माशांचे प्रजनन केंद्र उभारले जाणार आहे. केंद्र सरकारच्या नीलक्रांती योजनेअंतर्गत केंद्राची उभारणी केली जाणार असून, गोडय़ा पाण्यातील शोभिवंत माशांची पदास केली जाणार आहे.

१९५१ साली मुंबईतील डी. बी. तारापोरवाला यांनी दिलेल्या देणगीतून मत्स्यालयाची उभारणी करण्यात आली. त्यानंतर २० कोटी रुपये खर्चून मत्स्यालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. दुरुस्तीकरिता दोन वर्षे बंद असलेल्या या मत्स्यालयात देश-विदेशातील शोभिवंत मासे पाहायला मिळतात. सध्या मत्स्यालयातील सागरी जैवविविधता पाहण्यासाठी पर्यटकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

शोभिवंत माशांची पैदास येथील प्रस्तावित केंद्रातच होणार असल्याने व्यवस्थापनावरील खर्चाचा भार कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या ‘फ्रेश वॉटर इंटिग्रेटेड ऑर्नामेंटल युनिट’ या योजनेंतर्गत हे केंद्र उभारले जाईल, असे मत्स्य विभागाचे सहआयुक्त विनोद नाईक यांनी दिली. यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यासाठी २५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

२१ लाख पर्यटकांची भेट

नूतनीकरणानंतर वर्षांकाठी सहा ते सव्वासहा लाख पर्यटक मत्स्यालयाला भेट देत आहेत. त्यामुळे वर्षांला सव्वातीन कोटी रुपये उत्पन्न जमा होत असल्याचे त्यांनी सांगितले. नूतनीकरणानंतर मागील दोन वर्षांत तब्बल २१ लाख पर्यटकांनी मत्स्यालयाला भेट दिल्याचे मत्स्यालयाचे अधीक्षक अजिंक्य पाटील यांनी सांगितले.