वांद्रे येथील ठाकरे गटाच्या शाखेवर आज मुंबई महानगर पालिकेने आज कारवाई केली आहे. ही शाखा अनधिकृत असल्याचा दावा करत ही कारवाई झाल्याचं पालिकेकडून सांगण्यात येतंय. परंतु, यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी एकनाथ शिंदे आणि मुंबई पालिकेवर टीकास्त्र सोडलं आहे.

“राजकीय हेतूने आणि चिंधी मनाने या कारवाया होत आहेत. हे देशासमोर नाही तर जगासमोर येत आहे. जगात कोणालाही विचारलं तर गद्दारी चिंधी लोकांनी केली आहे. जे घाबरट आणि पळून गेले. व्हिडीओमध्ये दिसतंय की (कारवाईच्या) खोक्यांच्या राजवटीत बीएमसीत हुकुमशाही सुरू आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की आम्ही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा पुढे चालवत आहोत. पण त्यांच्याच फोटोवर हातोडा मारला आणि बुलडोझर चालवला आहे. हे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सहन करणार आहे का? हे सगळं सच्चा शिवसैनिक लक्षात ठेवणार आहे”, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा >> “…तेव्हा मला माझी आई आठवते”, यशस्विनी पुरस्कार सोहळ्यात शरद पवार भावुक; म्हणाले, “कतृत्त्वाचा वारसा…”

दरम्यान, वांद्रे पूर्वतील बेहराम पाडा येथे ठाकरे गटाचे शाखा कार्यालय आहे. माजी नगरसेवक हाजी अलम खान यांचे हे कार्यालय असून पालिकेने त्यावर आज हातोडा मारला. ही शाखा नसून रिक्षा स्टॅण्डचा एक भाग असल्याचं पालिकेकडून अधिकृतरित्या सांगण्यात आलं. परंतु, ही शाखाच असल्याचा दावा हाजी अलम खान यांनी एबीपीशी माझाशी बोलताना केला. हे बांधकाम परवानगी न घेता करण्यात आल्याने त्यावर कारवाई करण्यात आल्याचे पालिकेने सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाळासाहेब ठाकरे हेच आमचं सर्वात मोठं सुरक्षा कवच

ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केली या बातमीचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इन्कार केला आहे. मात्र तुम्ही मातोश्रीच्या बाहेर येऊन पाहिलंत तर तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. तो ठाकरे कुटुंबाचा विषय असल्याने मी त्यावर बोललो नाही. मात्र इतकंच सांगेन की आमचं सुरक्षा कवच हे बाळासाहेब ठाकरे आणि भारतातली जनता आहे. आम्ही भ्रष्टाचाराच्या आणि खोके वृत्तीच्या विरोधात लढत आहोत, आम्ही लढत राहणार असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.