मुंबई: वस्तूंची प्रत्यक्षात खरेदी अथवा विक्री न करता बनावट बिलांच्या साहाय्याने चार कोटींची ७४ लाख रुपयांची कर फसवणूक केल्याच्या आरोपाखाली ६२ वर्षीय व्यावसायिकाला आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली. आरोपीने २००८ ते २०१४ या कालावधीत हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

विठ्ठलभाई वल्लभभाई गजेरा (६२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो गुजरात अहमदाबाद येथील इंद्रपुरी सोसायटीतील रहिवासी आहे. गजेला हा मे.अभिलाशा सेल्स प्रा. लि. कंपनीचा मालक असून सहाय्यक विक्रीकर आयुक्त सुनील जाधव यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी २०१८ मध्ये वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आरोपीने विक्रीकर विभागाकडून बेकायदेशीररित्या टिन क्रमांक मिळवून कोणत्याही वस्तूची खरेदी विक्री न करता बनावट व्यवहार दाखवल्याचा आरोप आहे. आरोपी लोखंडी खांब व पोलादाच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. पण त्यांनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तूची खरेदी अथवा विक्री केली नाही. तरीही इतर व्यापाऱ्यांना खोट्या पावत्या देऊन त्यातून सरकारचा कर बुडवला. तपासानुसार २००८ ते २०१४ या कालावधीत आरोपीच्या कंपनीने दिलेल्या पावत्यांच्या आधारे चार कोटी ७४ लाख १४ हजार रुपयांचा कर गोळा केला व हा कर सरकारला दिला नाही, असा आरोप आहे. या व्यवहारांबाबतची माहिती घेण्यासाठी आरोपीच्या अहमदाबाद येथील पत्त्यावर पत्र पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सांगण्यात आले होते. पण ती पत्रे परत पाठवण्यात आली. आरोपी तपासात मदत करत नसल्यामुळे अखेर पोलिसांनी गुजरातला जाऊ आरोपीला अटक केली.