इमारतीच्या आवारात खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न जागरूक नागरिक आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे अपयशी ठरला. एखाद्या चित्रपटाला शोभावे असे हे नाटय़ शुक्रवारी दुपारी घडले. इमारतीतील तरुणांनी अपहरणकर्त्यांचा पाठलाग केल्यामुळे आणि पोलिसांनीही संपूर्ण शहरात नाकाबंदी केल्यामुळे अवघ्या दोन तासांत आरोपी गजाआड झालेच; पण हा संपूर्ण कट रचणारी मुलाच्या घरातील मोलकरीणही जेरबंद झाली.
विलेपार्ले पूर्व येथील परांजपे स्कीम क्रमांक ३ मधील पद्मा इमारतीत राहणारे व्यावसायिक सचिन कदम यांचा मुलगा शुभम दुपारी अडीचच्या सुमारास इमारतीखाली सायकल चालवित होता. त्यावेळी त्याच्या सोबत घरातील मोलकरीण सीमा धाडवे (२१) होती. त्याच सुमारास तेथे एका झायलो गाडीतून आलेल्या दोघांनी शुभमला गाडीत टाकले. यावेळी सीमाने आरडाओरड केल्यामुळे तेथे असलेल्या सन्मेश पटेल, रिषी भट व सुरज टिकसामौद यांनी मोटारसायकलवरून झायलोचा पाठलाग केला व गाडीचा नंबर पोलिसांना कळविला. पोलिसांनी त्वरित हालचाल करीत परिसरात नाकाबंदी केली. झायलोचा पाठलाग सुरू झाल्याने अपहरणकर्ते बावरले. त्यांनी शुभमला एका रिक्षात बसवले आणि रिक्षाचालकाला १०० रुपये आणि कदम यांच्या घरचा पत्ता दिला व शुभमला घरी सोडण्यास सांगितले. शुभम सुखरूप घरी पोहोचला. तर जोगेश्वरी येथे नाकाबंदीदरम्यान झायलो गाडी अडवून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
कदम यांची मोलकरीण सीमा धाडवे हिनेच हा कट रचला होता, असे चौकशीत उघड झाले.  अपहरणकर्ते शुभमच्या सुटकेसाठी १ कोटी रुपये मागणार होते, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. सीमा धाडवे हिच्यासह मिलींद उर्फ लक्ष्मण वराडकर (३५), सत्यजित उर्फ रॉबर्ट बाळकृष्ण (३३), रोहीत दिवेकर (२७) आणि भाग्येश बालन (२९) यांना अटक करण्यात आली आहे.
अपहरणाची रंगीत तालीम
सीमा ही कदम कुटुंबियांकडे गेल्या ७ वर्षांपासून कामाला होती. गेल्या अनेक दिवसांपासून ती व अन्य आरोपी अपहरणाची योजना आखत होते. विशेष म्हणजे, त्यांनी आदल्या दिवशी अपहरण कसे करायचे याची रंगीत तालिमही केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman son rescued kidnappers arrested in two hour
First published on: 16-03-2013 at 05:51 IST