भगवद्गीतेतील विचार कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नाहीत. त्यात संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारे तत्त्वज्ञान आहे. राष्ट्रग्रंथाचा दर्जा देऊन त्याला संकुचित करू नये, असे परखड मत संत साहित्याचे अभ्यासक व घुमान येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी ठाण्यात व्यक्त केले.
ज्ञानसाधना महाविद्यालयातील जनकवी पी. सावळाराम नगरीत भरविण्यात आलेल्या अभाविपच्या १३ व्या प्रतिभा संगम विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. १३ व्या शतकापासून १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत संत साहित्य हा एकच प्रवाह मराठीत प्रचलीत होता. संतांच्या रचनांमध्ये मराठी भाषेचे सौदर्य दडलेले आहे. मराठी शब्दसंपत्तींचा तो अमूल्य असा ठेवा आहे. त्यामुळे ‘संत साहित्य’ असा वेगळा प्रकार मानून मुख्य साहित्य परंपरेपासून त्यास बाजूला सारणे योग्य नाही. अशा प्रकारची विभागणी करणे साहित्याचा संकोच ठरेल.  खरेतर ज्ञानेश्वरी हा निवृत्तीनंतर वाचायचा ग्रंथ नाही. मात्र ज्ञानेश्वरांनी १६ व्या वर्षी लिहिलेला हा ग्रंथ  बहुतेकजण ६१ व्या वर्षांपर्यंत वाचायला घेत नाही, हे दुर्दैवी आहे, असेही मोरे म्हणाले. कार्यक्रमानंतर बोलताना नेमाडेंनी साहित्य संमेलनाविषयी केलेल्या वक्तव्यावर थेट भाष्य करणे त्यांनी टाळले.