|| शैलजा तिवले
कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेहाच्या संशयित रुग्णांची राज्यभर तपासणी
कुष्ठरोग, क्षयरोग यांबरोबरच कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान करण्यासाठी १३ ते २८ सप्टेंबर या काळात राज्यभरात रुग्णशोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
कुष्ठरोग आणि क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत गेल्या काही वर्षांमध्ये या आजारांचे वेळेत निदान करून उपचार सुरू करण्यासाठी रुग्णशोध मोहीम राबविली जाते. यामध्ये आरोग्य सेविका घरोघरी जाऊन सर्वसाधारपणे या आजारांची लक्षणे आढळलेल्या व्यक्तींची संशयित रुग्ण म्हणून नोंद करतात आणि पुढील तपासणीसाठी जवळच्या आरोग्यकेंद्रामध्ये पाठवितात. आत्तापर्यंत कुष्ठरोग आणि क्षयरोग याची स्वतंत्रपणे रुग्णशोध मोहीम राबविली गेली आहे. परंतु यावर्षी प्रथमच क्षयरोग, कुष्ठरोग या सोबतच असंसर्गजन्य आजारांची एकत्रित सव्र्हेक्षण केले जाणार आहे.
सर्वसाधारणपणे ३० वर्षांवरील व्यक्तीचे वजन आणि पोटाचा घेर मर्यादेपलीकडे आढळल्यास, दारूचे, सिगारेट इत्यादीचे व्यसन, घरामध्ये असंसर्गजन्य आजारांची आनुवंशिकता याची पाहणी केली जाईल. यावरून मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखे असंसर्गजन्य आजार असल्याची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांना पुढील तपासणीसाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर पाठविले जाईल. तेथे त्यांची रक्तदाब, मधुमेहासह इतर चाचण्या केल्या जातील. या माध्यमातून क्षयरोग किंवा कुष्ठरोगाचे निदान वेळेत होईलच. परंतु असंसर्गजन्य आजारांचेही वेळेत निदान होऊन संभाव्य धोके टाळता येतील, असे राज्य क्षयरोग आणि कुष्ठरोग विभागाच्या प्रमुख डॉ. पद्मजा जोगेवार यांनी सांगितले.
ग्रामीण भागात १०० टक्के आणि शहरी भागात ३० टक्के नागरिकांची तपासणी याअंतर्गत केली जाईल. राज्यभरात एकूण ८ कोटी ६६ लाख नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी एक महिला आरोग्य सेविका आणि एक पुरुष सेवक यांच्यावर ही जबाबदारी देण्यात येणार आहे.
कर्करोगाच्या संशयित रुग्णांचे निदान
स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहे. या आजारांच्या लक्षणांबाबत विशेष माहिती महिलांमध्ये नसते. काही वेळस तक्रारी असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा जवळपास महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपचार केले जात नाहीत. घरोघरी या दोन्ही कर्करोगाच्या संभाव्य लक्षणांची तपासणी केली जाईल. तसेच या आजारांबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.
मोहीम कशी असणार?
राज्यभरातील संशयित असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांचे एकाच वेळेस निदान करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू केली आहे. कुष्ठरोग किंवा क्षयरोगाच्या ठरावीक लक्षणांवरून संशयित रुग्ण ओळखणे शक्य आहे. परंतु असंसर्गजन्य आजारांची अशी ठोस लक्षणे नाहीत. त्यामुळे आरोग्यसेविकांकडे १० प्रश्नांचा संच देण्यात येणार आहे. यामध्ये व्यक्तीचे वय, वजन, पोटाचा घेर याची मोजणी केली जाईल.