मुंबई :भारतात २०२४ मध्ये सुमारे १५ लाख नवीन कर्करोग रुग्णांची नोंद झाली होती, तर २०२५ अखएरीस हे प्रमाण १७ लाखांवर जाण्याचा अंदाज आयसीएमआरने व्यक्त केला आहे. यातील जवळपास ६५ टक्के रुग्ण हे आजही उशिरा निदान झाल्याने योग्य उपचारापासून वंचित राहतात. या पार्श्वभूमीवर नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या (एनसीजी) माध्यमातून देशभरात कॅन्सर रुग्णांवर नियोजनबद्ध उपचार करण्यात येत असून एनसीजी व सलग्न संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे ८.६ लाख नवीन कर्करोग रुग्णांवर उपचार केले जातात, जे भारतातील एकूण कर्करोग रुग्णांच्या सुमारे ६० टक्के आहेत. या अनुषंगाने नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या वार्षिक बैठकीत आगामी काळात कर्करुग्णांवर एआय आधारित व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची तसेच कर्करोगाच्या लवकर निदानासाठी एआय आधारित चाचण्या विकसित करणे आणि ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत कर्करोग निदानाची सेवा पोहोचवण्याला अग्रक्रम देण्याची भूमिका मान्यवरांनी व्यक्त केली.

नॅशनल कॅन्सर ग्रिड (एनसीजी) ची २०२५ ची वार्षिक बैठक मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे नुकतीच पार पडली. ही बैठक एनसीजीच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण, प्रगतीचा आढावा आणि भविष्यातील सहयोगी प्रयत्नांसाठी दिशा ठरवण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली. या बैठकीत देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्करोग नियंत्रणाचे व्यापक धोरण मांडण्यात आले. भारतातील सुमारे ३५० पेक्षा अधिक कर्करोग संस्थांना एकत्र आणणाऱ्या या मंचावर, या वर्षी ग्लोबल स्ट्रॅटेजीस फॉर कॅन्सर कंट्रोल या संकल्पनेवर सखोल चर्चा झाली.या बैठकीत आयसीएमआर, जागतिक आरोग्य संघटना, अमेरिकन कॅन्सर सोलायटी, युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल अशा विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कर्करोग प्रतिबंध, त्वरित निदान, दर्जेदार उपचार आणि दीर्घकालीन पुनर्वसन या सर्वच टप्प्यांवर अधिक परिणामकारक धोरणे राबविण्यासाठी एकसंध उपाययोजना आखण्यावर भर देण्यात आला. तसेच खर्चिक संशोधनावर भर,कर्करोग व्यवस्थापनासाठी डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर प्रामुख्याने भर देण्यात आला.

टाटा कॅन्सरचे संचालक डॉ. सी. एस. प्रभु यांनी सांगितले की,भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात, कर्करोग नियंत्रणासाठी स्थानिक गरजा, संसाधनांची उपलब्धता आणि जनजागृती यांच्या आधारे धोरण राबविणे अत्यंत आवश्यक आहे. या बैठकीतून जागतिक स्तरावर वापरली जाणारी प्रभावी मॉडेल्स भारतात कशा प्रकारे समायोजित करता येतील यावर चर्चा झाली. एनसीजीचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र बडवे यांनी स्पष्ट केले की, भारताने आपल्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात कर्करोगावर लक्ष केंद्रीत केले असून, इ- हेल्थ, टेलिमेडिसीन व डिजीटल पॅथॉलॉजी सारख्या नवतंत्रज्ञानाचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे.ग्रामीण भागांतील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत कर्करोग निदानाची सेवा पोहोचवणे,राज्यस्तरावर कर्करोग रजिस्ट्रीला बळकटी देणे,कमी किमतीत उपलब्ध असलेले पण उच्च परिणामकारक औषधोपचार वाढवणे,कर्करोगाच्या लवकर निदानासाठी एआय आधारित चाचण्या विकसित करणे तसेच रुग्णांच्या सामाजिक, मानसिक व आर्थिक पुनर्वसनावर लक्ष केंद्रीत करण्यावरह मान्यवरांनी भर दिला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोग नियंत्रण विभागाच्या सल्लागार डॉ. मेरी ऍन व्हॉन्ग यांनी सांगितले की, भारतासारखा देश जागतिक कर्करोग रणनीतीसाठी ‘डिजिटल आणि लोक-केंद्रित आरोग्य’ या मॉडेलमुळे आदर्श ठरू शकतो. त्यांनी भारतातील एनसीजी मॉडेलचे कौतुक करताना अन्य विकसनशील देशांनी याचा अवलंब करण्याची गरज असल्याचे नमूद केले. या बैठकीच्या निमित्ताने ‘एनसीजी नॉलेज हब’ हे नविन डिजिटल प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले, ज्यावरून सर्व रुग्णालये, संशोधन संस्था आणि डॉक्टरांना कर्करोगावरील अद्ययावत मार्गदर्शक तत्त्वे, उपचार प्रोटोकॉल्स, आणि शैक्षणिक साधने उपलब्ध होतील. यावेळी कर्करोग नियंत्रण क्षेत्रातील योगदानासाठी चार दिग्गजांना एलसीजी लाइफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आले. त्यात सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि टाटा मेमोरियल सेंटरचे माजी संचालक डॉ राजेंद्र बडवे, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आणि नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, झज्जरचे माजी प्रमुख प्रा. जी. के. राठ, वैद्यकीय ऑन्कॉलॉजिस्ट आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी प्राध्यापक डॉ. सुरेश अडवाणी, तसेच एएससीओच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रा. जुली ग्रालो यांचा समावेश होता.