अध्ययनाच्या अनुभवाबरोबरच व नेट-सेट, एमफिल आदी अनेक पात्रता निकषांची पूर्तता केलेले ढीगभर उमेदवार डावलून केवळ पीएच.डी. केलेल्या दोन उमेदवारांची वर्णी मुंबई विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागातील साहाय्यक प्राध्यापकपदी लावण्यात येणार असल्याने डावलल्या गेलेल्या उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी आहे. हे उमेदवार या सगळ्याची तक्रार राज्यपालांकडे करण्याच्या तयारीत असून गरज भासल्यास संबंधित निवड प्रक्रियेला न्यायालयात आव्हान देणार आहेत.
विभागातील साहाय्यक प्राध्यापकांच्या दोन रिक्त पदांकरिता १०० हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती अवघ्या तीन तासांत घेण्यात आल्याने या निवड प्रक्रियेबाबत आधीपासूनच साशंकता व्यक्त केली जात होती. या संबंधातले वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केल्यानंतर केवळ ७३ उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवशी हजेरी लावल्याचा खुलासा विद्यापीठातर्फे करण्यात आला. प्रत्येक उमेदवाराला सरासरी साडेतीन मिनिटांचा वेळ देण्यात आला, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे. तसेच, मुलाखती घेताना केवळ सेट-नेटच नव्हे तर संशोधन, अध्ययनाचा अनुभव व विभागाच्या विकासासाठीचे नेतृत्व असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती अधिक वेळ घेतल्या गेल्या, असा खुलासा विद्यापीठाने केला आहे. पण प्रत्यक्षात विविध अर्हता मिळविलेल्या उमेदवारांना डावलून केवळ पीएच.डी.धारकांचाच विचार निवड समितीने केल्याचे दिसून येते.
या निवड प्रक्रियेत नेट-सेट केलेले ५० उमेदवार होते, तर नेट-सेटशिवाय एमफिल व पीएच.डी. केलेले आठ उमेदवार होते. तसेच ज्यांनी नेट-सेटबरोबरच एमफिलही केले होते असे २६ उमेदवार होते. नेट-सेटबरोबरच पीएच.डी. केलेले १० व एमफिल आणि पीएच.डी. केलेले चार उमेदवार मुलाखतींना सामोरे गेले होते. पण, समितीने केवळ पीएच.डी. केलेल्या पाच उमेदवारांपैकी दोघाजणांची निवड केल्याने या प्रक्रियेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
निवड झालेल्या दोघांपैकी एकाने तर पदांसाठी जाहिरात आली तेव्हा एकाही अर्हतेची पूर्तता केलेली नव्हती. जाहिरात आली २ मे २०१२ ला. उमेदवारांना २ जून, २०१२पर्यंत अर्ज द्यायचे होते. तोपर्यंतही या उमेदवाराला पीएच.डी. बहाल झालेली नव्हती. त्याला ती मिळाली १३ जानेवारी, २०१३ला. म्हणजे एप्रिलमध्ये मुलाखती होईपर्यंत संबंधित उमेदवाराच्या पीएच.डी. अर्हतेला उणेपुरे तीन महिनेच झाले होते. इतकेच नव्हे तर हे उमेदवार अमरावतीच्या महाविद्यालयात तासिका तत्त्वावर काम करतात, तरीही त्यांचा नियुक्तीकरिता विचार केला गेल्याने अन्य उमेदवारांमध्ये कमालीची नाराजी आहे.
या उलट अर्ज करण्यासाठी दिलेल्या मुदतीदरम्यान म्हणजे ५ जून २०१२लाच एका उमेदवाराला पीएच.डी. मिळाली होती. पण, या उमेदवाराला साधे मुलाखतीलाही बोलाविले गेले नाही. दुसऱ्या उमेदवार महिला असून त्याही पूर्णवेळ नाहीत, पण ‘या महिलेचे पती विद्यापीठातील एका विभागात प्राध्यापक आहेत. कदाचित त्यांची हीच ‘अर्हता’ आमच्या अनुभव व अर्हतांपेक्षा मोठी ठरली असावी,’ अशी संतापजनक प्रतिक्रिया एका डावलल्या गेलेल्या उमेदवाराने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. ‘आमच्यापैकी अनेक उमेदवारांकडे पीएच.डी., एमफिल बरोबरच नेट-सेटही होते. इतकेच नव्हे तर पूर्णवेळ शिक्षक म्हणून १२-१३ वर्षांचा अध्ययनाचा अनुभव आमच्याकडे आहे, पण याचा विचार केला गेला नाही,’ अशा शब्दांत या उमेदवाराने नाराजी व्यक्त केली. आम्ही या सर्व प्रकाराची तक्रार राज्यपालांकडे करणार असून आमच्यावरील अन्यायासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊनही दाद मागू, अशी प्रतिक्रिया या उमेदवाराने दिली.