या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ब्युटी पार्लर ते इंटरनॅशनल स्पा, एका उद्योजिकेचा प्रवास आज ‘व्हिवा लाउंज’मध्ये

साधी सौंदर्योपचार करणारी ब्युटी पार्लर व्यावसायिक देशातील सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील आघाडीची उद्योजिका कशी बनू शकते याचा करिअर मंत्र दादरमध्ये आज होणाऱ्या ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’मध्ये ऐकायला मिळणार आहे. भारताच्या ‘वेलनेस अ‍ॅम्बेसेडर’ म्हणून नावाजल्या गेलेल्या स्पा तज्ज्ञ आणि उद्योजिका रेखा चौधरी यांच्याशी मुक्त संवादाच्या  कार्यक्रमानिमित्ताने.

ब्युटी पार्लर चालवणाऱ्या स्त्रिया या व्यवसायाकडे करिअर म्हणून अभावानेच बघतात.  त्यामुळे पावलोपावली ब्युटी पार्लर दिसत असूनदेखील त्याचे मोठय़ा उद्योगात रूपांतर झालेले अभावाने दिसते. छोटय़ा गावातील ब्युटी पार्लरपासून सुरुवात करून वेलनेस क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका बनलेल्या रेखा चौधरी यांच्याकडून हाच करिअर मंत्र जाणून घ्यायची संधी व्हिवा लाउंजमधून मिळणार आहे.

देश-विदेशातील पंचतारांकित हॉटेल्समधील स्पा व्यवस्थापन रेखा चौधरी यांच्या संस्थेमार्फत चालते. एका छोटय़ा गावातील ‘ब्युटी पार्लर’पासून रेखा यांनी सुरुवात केली. नंदुरबारसारख्या ग्रामीण भागात शिक्षण झाल्याने इंग्रजीचा गंध नाही, नवीन सौंदर्योपचारांची तोंडओळखही नाही, अशी सामान्य पाश्र्वभूमी असतानाही रेखा यांनी हे विस्मयकारक यश मिळवले आहे.

देशी-विदेशी स्पा उत्पादनांच्या व्यवसायाखेरीज, साहित्यसामुग्री, सेवा आणि या क्षेत्रातील प्रशिक्षणाचे कामही रेखा यांनी स्थापन केलेली जेसीकेआरसी ही कंपनी करते. याशिवाय स्पा ट्रीटमेंटचे आंतरराष्ट्रीय पेटंट घेणारी ती पहिली भारतीय स्त्री आहे.

सध्या वीसपेक्षा जास्त विदेशी ब्रॅण्ड्च्या त्या वितरक असून विपणनाची जबाबदारीही त्या पाहतात.  याशिवाय वेलनेस उद्योगातील प्रशिक्षण देणारी संस्थाही त्यांनी स्थापन केली आहे. त्यामार्फत स्पा आणि वेलनेस क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना त्या मार्गदर्शन करीत आहेत.

वेलनेस क्षेत्रातील करिअर संधी, या क्षेत्रातील आव्हाने, यशाचे मार्ग या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे रेखा यांच्याबरोबर होणाऱ्या ‘केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंज’मधील संवादातून मिळू शकतील. ग्रामीण भागातील सामान्य गृहिणी ते जगभर फिरणारी स्पातज्ज्ञ आणि उद्योजिका हा विस्मयकारक प्रवास रेखा यांच्या तोंडून ऐकायची संधी आज मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

  • कधी – बुधवार, १६ मार्च
  • कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.), मुंबई</li>
  • वेळ – सायंकाळी ४.४५

(प्रवेश विनामूल्य. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Career guidance on spa industry in loksatta viva lounge
First published on: 16-03-2016 at 04:54 IST