शासनाचा बनावट शैक्षणिक अध्यादेश तयार करून त्या आधारे अकरावी, बारावीच्या ९१ विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विषयात प्रवेश देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान करणाऱ्या डोंबिवलीतील डोंबिवली मित्र मंडळाचे देवकीनंद कानजी विरजी छेडा महाविद्यालयाचे अध्यक्ष व सचिवांविरुद्ध ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांनी शनिवारी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या संस्थेने विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विषयासाठी देवकीनंद छेडा महाविद्यालयात प्रवेश घेता यावा या हेतुने शासनाचा एक बनावट अध्यादेश(जीआर) तयार केला. या अध्यादेशाप्रमाणे २०१२ ते २०१४ या कालावधीत ११वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विषयात ३० विद्यार्थी संख्येप्रमाणे एकूण ९१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले.
काही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाविषयी संशय आल्याने ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी रामदास शिंदे यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार दाखल झाली.शिंदे यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्यांना ज्या शासकीय अध्यादेशाच्या आधारे विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विषयात प्रवेश दिले तो अध्यादेश बनावट असल्याचे आढळून आले.
विद्यार्थ्यांची संस्थेने फसवणूक केल्याने शिंदे यांनी संस्थेचे अध्यक्ष मनीष मेघजी वीरा व सचिवांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
केला.