मुंबई : आर्यन खान याच्या सुटकेसाठी अभिनेता शाहरूख खान याच्याकडे २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानेही (ईडी) केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) पश्चिम क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्याच्या आणि याचिका प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्याच्या मागणीसाठी वानखेडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर येत्या १५ फेब्रुवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. आर्यन खान याच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच आधारे ईडीने वानखेडे यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा रद्द केला आहे. याप्रकरणी एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांना समन्सही बजावण्यात आले आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी उच्च न्यायालयाने वानखेडे यांना अटकेपासून अंतिरम दिलासा दिला असून त्याची मुदतही १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. कोर्डिलिया क्रुझवरील अमली पदार्थ पार्टीवर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखालील एनसीबीच्या पश्चिम विभागाने कारवाई केली होती. तसेच, आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. आर्यनला २८ ऑक्टोबर २०२१ रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. तर, २७ मे २०२२ रोजी एनसीबीने आर्यन याच्याविरोधात काहीच पुरावे नसल्याचे एक पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते.
ईडीने दाखल गुन्हा आश्चर्यकारक – समीर वानखेडे
ईडीने २०२३ मध्ये संबंधित ईसीआयआर (गुन्हा) नोंदवला होता. मुंबई उच्च न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या सीबीआयच्या गुन्ह्याच्या आधारे हा ईसीआयआर दाखल करण्यात आला ही आश्चर्यकारक बाब आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने अधिक भाष्य करण्याचा माझा हेतू नाही. मी योग्य वेळी न्यायालयात योग्य उत्तर देईन. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले.