प्रसाद रावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण मुंबईतील ३०० जणांवर न्यायालयीन कारवाई करण्याचा महापालिकेचा निर्णय

परिसर अस्वच्छ केल्याप्रकरणी नोटीस बजावल्यानंतरही घरगल्ल्यांमध्ये कचरा भिरकावणाऱ्या दक्षिण मुंबईमधील तब्बल ३०० जणांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. लवकरच याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये इमारत मालकांसोबत रहिवाशांचाही समावेश आहे.

दक्षिण मुंबईमध्ये दाटीवाटीने मोठय़ा संख्येने चाळी उभ्या असून यापैकी बहुसंख्य इमारती १०० वर्षांपूर्वी बांधण्यात आल्या आहेत. दोन चाळींमध्ये जेमतेम एक-दीड फूट रुंद घरगल्ल्या आहेत. या चाळींतील रहिवासी कित्येक वर्षांपासून या गल्ल्यांत कचरा, उष्टे खरकटे भिरकावतात. या अरुंद घरगल्ल्यांची सफाई करणे अवघड असते. रहिवाशांनी घरगल्लीत कचरा टाकू नये असे आवाहन पालिका वारंवार करते, मात्र रहिवाशांची सवय अद्याप सुटलेली नाही.

याच घरगल्ल्यांमधून गेलेल्या छोटय़ा जलवाहिन्यांच्या माध्यमातून रहिवाशांच्या घरात पाणीपुरवठा होतो. घरगल्ल्यांमध्ये साचणाऱ्या सांडपाण्यामुळे जलवाहिन्या गंजल्या असून गटारातील पाणी त्यात जात आहे. परिणामी, रहिवाशांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यांच्या आरोग्याचे प्रश्नही निर्माण होत आहेत. घरगल्ल्यांमध्ये साचणाऱ्या कचऱ्यामुळे घुशी आणि उंदरांचा सुळसुळाट आणि डासांचा प्रादुर्भाव होत असून त्यांचाही उपद्रव रहिवाशांना सहन करावा लागत आहे.

रहिवाशांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे कारण घरगल्ल्यांमधील कचऱ्यात दडले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेने काही भागांत घंटागाडी सुरू केली, जनजागृती मोहीमही राबवण्यात आली, मात्र रहिवाशांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ‘सी’ विभाग कार्यालयाने घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकण्याला आळा घालण्यासाठी कडक धोरण अवलंबिले.

कचरा टाकणाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली. नोव्हेंबर २०१८ पासून आजतागायत तब्बल दोन हजार कुटुंबांवर पालिकेने नोटीस बजावली आहे. हातात नोटीस पडल्यानंतर कुंभारवाडा, फणसवाडी, बरोजलेन, कॅवल लेन १, २, ४ आणि ५, लोहार चाळ आदी परिसरातील काही रहिवाशांनी घरगल्लीमध्ये कचरा टाकणे बंद केल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसरातील रहिवाशी स्वत:हून कचरा घंटागाडीत टाकू लागले असून घरगल्ल्यांमध्ये स्वच्छता राखली जात आहे. तर काही भागांत ३० टक्के सुधारणा झाली आहे.

नोटीस बजावल्यानंतरही ३०० कुटुंबांकडून घरगल्ल्यांमध्येच कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या सर्वाची प्रकरणे लवकरच पालिकेच्या विधी खात्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. त्यानंतर ३०० कुटुंबीयांविरुद्ध खटला दाखल करण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिकेने नोटीस बजावल्यानंतर घरगल्ल्यांमध्ये कचरा टाकण्यास आळा बसला आहे. रहिवासी स्वत:हून पालिकेच्या गाडीत कचरा टाकू लागले आहेत. मात्र नोटीस बजावूनही गल्लीत कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सर्व प्रकरणे लवकरच पालिकेच्या विधी खात्याकडे सोपविण्यात येणार आहेत.

– शंकर मुढे, साहाय्यक अभियंता (घनकचरा व्यवस्थापन)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cases on garbage dumpers
First published on: 30-01-2019 at 02:17 IST