आता प्रत्येक डब्यात ६ कॅमेऱ्यांची नजर; मध्य रेल्वेचा प्रस्ताव

लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचे नियोजन असतानाच आता मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकलच्या प्रत्येक म्हणजेच बारा डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव बनवून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. रेल्वेचा हा

सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले. यामुळे प्रवाशाचा रेल्वेप्रवास भीतीविरहीत आणि उपद्रवमुक्त  होईल, अशी आशा रेल्वेकडून व्यक्त करण्यात आली.

लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची छेडछाड, विनयभंगाच्या घटना गेल्या काही वर्षांत घडल्या. त्याचे गांभीर्य पाहून महिलांच्या सुरक्षेसाठी लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पश्चिम व मध्य रेल्वेने त्याची अंमलबजावणीही केली. गेल्या वर्षभरात पश्चिम रेल्वेवरील १७ लोकलच्या ६० डब्यात तर मध्य रेल्वेवरील १० लोकलच्या ५० महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले. हे सीसीटीव्ही प्रथम व द्वितीय श्रेणीच्या डब्यात बसविले आहेत. ते प्रत्येक डब्यात दोन किंवा तीन आहेत. सुरुवातीला काही डब्यात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हींतून थेट चित्रीकरण केले जात होते. मात्र त्याला महिला प्रवाशांनी विरोध केल्यानंतर अखेर रेकॉर्डिग केले जाते. टप्याटप्याने सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन असतानाच मध्य रेल्वेने अपंगांच्या डब्यातही सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता. अपंग डब्यात अन्य प्रवाशांची घुसखोरी होत असल्याने अशा प्रवाशांना अटकाव करतानाच वारंवार घुसखोरी करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे पोलिसांना सहज पकडणे शक्य व्हावे, यासाठी १४५ लोकलमधील २९० अपंगांच्या डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव तयार केला.

नक्की काय होणार?

महिला व अपंगांच्या डब्यात सीसीटीव्ही बसविले जात असतानाच फक्त पुरुषांचे डबेच शिल्लक राहात असल्याने अखेर लोकलच्या सर्व बारा डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आले. मध्य रेल्वेकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यानुसार प्रत्येक डब्यात पाच ते सहा सीसीटीव्ही बसविले जातील. त्याचे थेट चित्रीकरण केले तर अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे थेट चित्रीकरण करावे की रेकॉर्डिग करावे, याबाबत मात्र निर्णय झालेला नाही. जवळपास ५०० कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च अपेक्षित आहे.

  • या संदर्भात मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या सर्व डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून रेल्वे बोर्डाकडमून त्याची अंतिम मंजुरी घेण्यात येईल.
  • मध्य रेल्वेच्या ताफ्यात १४५ लोकल असून प्रत्यक्षात दररोज १२२ लोकलच प्रवाशांच्या सेवेत असतात. या लोकलच्या १,६४७ फेऱ्या होतात.