तांत्रिक विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांकडे असणाऱ्या एकाच प्रकारच्या चावीच्या आधारे गर्दीच्या वेळी मोटारमनकोचच्या डब्यात मित्रमंडळीसह शिरकाव करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश बसावा, यासाठी मोटारमनकोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना रेल्वेकडून चाचपडून पाहिली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र केवळ रेल्वे कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वायफळ खर्चाचा घाट घातला जात असल्याची टीका रेल्वे संघटनांकडून केली जात आहे. उपनगरीय एका लोकल गाडीमध्ये चार छोटेखानी मोटारमनकोच असतात. पेंटाग्राफचे संपूर्ण नियंत्रण या कक्षातून केले जाते. रेल्वेच्या तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांना या कक्षाचे दार उघडण्यासाठी एकाच प्रकारची चावी दिली जाते. याचा वापर केवळ ओव्हरहेड वायर बिघाडा वेळी करण्याचा नियम आहे. मात्र कोणताही तांत्रिक बिघाड झाला नसताना रेल्वे कर्मचारी हा दरवाजा बेकायदेशीर उघडतात. यावर तोडगा म्हणून रेल्वे प्रशासनाने हा पर्याय निवडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.