मुंबईची २०६० सालापर्यंतची पाण्याची मागणी पूर्ण करणाऱ्या दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पाला गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. दमणगंगा – िपजाळ प्रकल्पाची किंमत २ हजार ७४६ कोटी रुपये आहे. या प्रकल्पातून मुंबई शहरास १ हजार ५८६ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध होणार आहे.
राज्याची सिंचन क्षमता फक्त १८ टक्के इतकी आहे. राज्याच्या विविध भागात सध्या बऱ्याच सिंचन प्रकल्पांचे काम सुरू आहे. बरेच प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत. हे सिंचन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहेत. यासाठी केंद्र शासनाने जास्तीतजास्त मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केले. महाराष्ट्राची खरी शक्ती शेतीत आहे, त्यामुळे या व्यवसायाला चालना देण्यासाठी पाण्याची अधिकाधिक उपलब्धता गरजेची आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याची सिंचन क्षमता वाढविणे आवश्यक असून त्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करेल, असे आश्वासन उमा भारती यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्र व गुजरात राज्याने दमणगंगा-िपजाळ व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. ही नदीजोड योजना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून राबविण्यास केंद्र शासनाने मान्य केले. यामुळे या प्रकल्प किंमतीच्या ७५ टक्के अर्थसहाय्य केंद्र शासन देणार आहे.