रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडून आज आढावा

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी केंद्र सरकार आग्रही असून, या प्रकल्पासह मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी मुंबईत बैठक आयोजित केली आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्प हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो लवकर पूर्ण करण्याचे केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रयत्न आहेत. या प्रकल्पास महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी विरोध केला असला तरी शिवसेनेकडून ठाणे जिल्ह्य़ातील जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्याची भूमिका घेण्यात आली आहे. राजकीय विरोध व करोनामुळे गेली दोन वर्षे प्रकल्पाचे भूसंपादन थंडच आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील भूमिगत स्थानकाच्या जागेत करोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. करोनाची साथ संपेपर्यंत या रुग्णालयाची गरज असल्याने ही जागा मिळण्यात अडचणी आहेत.

त्यामुळे भूसंपादनासह अन्य प्रश्नांबाबत महसूल खात्याचे अधिकारी, ठाणे व पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून बुधवारी आढावा घेतला जाईल. हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन व रेल्वे मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असल्याचे दानवे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.