मध्य रेल्वेवर २०१८ मध्ये सुविधांचा वर्षांव; पादचारी पूल आणि आपत्कालीन कक्षही सेवेत येणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेने २०१८ मध्ये प्रवाशांसाठी अनेक सेवा, सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसही सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. २१४ सरकते जिने मंजूर करतानाच त्याचे सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ३१८ एटीव्हीएम, सरकते जिने, पादचारी पूल, आपत्कालीन कक्षही सेवेत दाखल होतानाच पादचारी पुलांची उंची वाढविण्याचे कामही पूर्ण करण्यात येईल.

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वेकडून नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. काही पुलांचे कामही सुरू करण्यात आले आहे. मार्च २०१८ पर्यंत ११ पादचारी पुलांचे काम पूर्ण होईल. तर आणखी २७ पादचारी पूल २०१८-१९ मध्ये सेवेत येतील. मध्य रेल्वेवरील लष्कराकडून उभारण्यात येणारा करी रोड आणि परेल व एल्फिन्स्टन स्थानकाला जोडणारा पूल ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार आहे. कमी उंचीचे फलाट आणि लोकल गाडय़ांमधील मोकळ्या जागेत पडून होणाऱ्या अपघातांचा सामना आजही प्रवाशांना करावा लागतो. २०१६ मध्ये १३ तर २०१७ मध्ये १५ प्रवाशांना त्यामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तत्पूर्वी फलाटांची उंची वाढविण्याची कामे गेल्या दोन वर्षांत रेल्वेकडून हाती घेण्यात आली तरी ती पूर्ण झालेली नाहीत. आतापर्यंत १९३ फलाटांची उंची वाढविण्यात आली असून ८७ फलाटांची उंची जून २०१८ पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे होणारे अपघात पूर्णपणे थांबतील असा दावा रेल्वेकडून केला जात आहे. गरोदर महिला, वृद्धांना रेल्वे स्थानकातील पादचारी पूल चढताना होणारा मनस्ताप पाहता स्थानकात सरकते जिने उभारण्यास सुरुवात केली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या २३ सरकते जिने असून ४७ सरकते जिने मार्च २०१८ पर्यंत बसविले जातील. तर आणखी २१४ सरकते जिने बसविण्यास मंजुरी मिळाली असून त्याचे सर्वेक्षणही पूर्ण करण्यात आले आहे. हे सर्व जिने डिसेंबर २०१८ पर्यंत बसविण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती दिली.

आणखी मिळणाऱ्या सुविधा

* ३१३ एटीव्हीएम यंत्रे असून आणखी ३१८ एटीव्हीएम स्थानकात बसविले जातील.

* १६ लिफ्ट असून पाच लवकरच सुरू होतील. तर १७ लिफ्ट मार्च २०१८ पर्यंत येतील.

* आपत्कालीन वैद्यकीय कक्ष १२ स्थानकांत असून आणखी १४ स्थानकांवर येत्या एप्रिल २०१८ पर्यंत बसविण्यात येतील.

* सध्या ७८ स्थानकांवर २,९१४ सीसीटीव्ही असून आणखी ९०० कॅमेरे २०१८-१९ मध्ये बसविले जातील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway announce huge facilities on station in
First published on: 23-01-2018 at 03:35 IST