ठाणे-कळवा स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर मंगळवारी एका उपनगरी गाडीने तीन म्हशींना उडवले. या म्हशी गतप्राण झाल्याने त्यांना रुळांवरून बाजूला काढण्यास ४० मिनिटांचा कालावधी लागला. दुसऱ्या प्रकरणात कल्याणकडे जाणाऱ्या गाडीच्या चाकांजवळ आग लागल्याने ही गाडी २० मिनिटे अडकून राहिली. त्यामुळे तब्बल १० सेवा रद्द झाल्या आणि १००हून अधिक सेवांना या बिघाडांचा फटका बसला. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेच्या वक्तशीरपणाचे दिवाळे वाजले.
मंगळवारी सकाळी ठाण्याहून निघालेल्या कल्याण धीम्या गाडीच्या मार्गात तीन म्हशी आल्या. भरधाव गाडीला धडकल्याने त्या जागीच ठार झाल्या. परिणामी ही गाडी आणि तिच्यामागे येणाऱ्या गाडय़ा रखडल्या.
या घटनेनंतर वाहतूक सुरू होते तोच सकाळी १०.५३ वाजता ठाणे स्थानकाजवळ कल्याणच्या दिशेने जाणारी धीमी गाडी अचानक थांबली. या गाडीच्या मोटर कोचजवळून धूर येऊ लागला. गाडीच्या ब्रेकमध्ये बिघाड असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरी रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे ‘भेल’ बनावटीच्या या गाडीच्या मोटर कोचमध्ये बिघाड असल्याने चाकांजवळ आग लागली होती.