दिवा येथील कट-कनेक्शन कामासाठी मरे-एमआरव्हीसी सज्ज; आठ ते दहा तासांच्या ब्लॉकचे नियोजन

दिवा स्थानकांवर जलद गाडय़ांना थांबा देण्यासाठी आवश्यक असलेल्या कट-कनेक्शनच्या कामांसाठीचा पहिला महा-मेगाब्लॉक १८ सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आला आहे. मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसी या दोन्ही संस्था या ब्लॉकचे नियोजन करत असून हा ब्लॉक आठ किंवा दहा तासांसाठी घेण्यात येईल. त्याआधी दिवा येथील जलद मार्गासाठीचा नव्याने बांधलेला प्लॅटफॉर्म सुरू होणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे या ब्लॉकदरम्यान किती सेवा रद्द करायच्या, प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी काय करायचे, आदी गोष्टींचे नियोजन १५ सप्टेंबपर्यंत पूर्ण होणार आहे. दिवा येथील प्रवाशांच्या उग्र आंदोलनानंतर दिवा स्थानकातही जलद गाडय़ा थांबवण्यासाठी या स्थानकाची पुनर्रचना करण्याचे काम रेल्वेने एमआरव्हीसीमार्फत सुरू केले. गेली दीड वर्षे चाललेल्या  या कामाचा अंतिम टप्पा म्हणून या स्थानकातील नव्या मार्गिका जुन्या मार्गिकांना जोडण्यासाठी कट-कनेक्शनचे काम करणे आवश्यक आहे. हे काम सप्टेंबर महिन्यात चार मोठे ब्लॉक घेऊन पूर्ण करण्यात येईल, असे मध्य रेल्वेने ऑक्टोबर महिन्यात सांगितले होते. मात्र सप्टेंबर महिन्यातील दोन रविवारी गणेशोत्सवाची लगबग असल्याने आता यापैकी पहिला ब्लॉक गणपती गेल्यानंतर १८ तारखेला घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.

हा ब्लॉक दहा तासांचा घ्यावा, असे एमआरव्हीसीने सुचवले आहे. पण त्याऐवजी आठ तासांचा ब्लॉक घेऊन कामे करता येतील का, याची चाचपणी सध्या सुरू आहे. दोन्ही परिस्थितींमध्ये किती सेवा रद्द कराव्या लागतील, त्याचा परिणाम कळवा-मुंब्रा तसेच कोपर व ठाकुर्ली या स्थानकांतील प्रवाशांवर काय होईल, त्यांची गैरसोय दूर करण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत आता मध्य रेल्वे व एमआरव्हीसी अधिकाऱ्यांच्या चर्चा सुरू असून १५ सप्टेंबपर्यंत या  नियोजन जाहीर होणार आहे.

काय काम होणार?

सध्या कल्याणच्या दिशेने जाणारी धिमी मार्गिका दिवा पश्चिमेकडे नव्याने बांधलेल्या प्लॅटफॉर्मकडे वळवावी लागणार आहे. त्यासाठी ही मार्गिका सध्या असलेल्या मार्गापासून तोडून नव्या मार्गाला जोडावी लागेल. त्याचे काम या पहिल्या ब्लॉकमध्ये होईल. त्यासाठी डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक ठाणे ते कल्याण यांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवली जाईल. त्यामुळे मुंब्रा व कळवा येथील प्रवाशांना त्रास सोसावा लागणार आहे.

रेल्वे विशेष बसगाडय़ा चालवणार

या आठ-दहा तासांच्या महा-मेगाब्लॉकदरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने एमआरव्हीसीला काही बसगाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याची विनंती केली आहे. या बसगाडय़ा रेल्वे स्वत:च्या खर्चाने प्रवाशांसाठी चालवणार आहे. या गाडय़ा ठाणे ते मुंब्रा आणि दिवा ते ठाकुर्ली या दरम्यान चालवण्यात येतील. रेल्वेचे तिकीट किंवा पास असलेल्या प्रवाशांनाच या गाडय़ांमधून प्रवास करता येणार आहे.